१३५ रक्तदात्यांनी केले स्वेच्छेने रक्तदान
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- निरंकारी सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने संत निरंकारी भवन, भिलजी येथे रविवारी (३० नोव्हेंबर) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. उत्साही वातावरणात पार पडलेल्या या शिबिराला परिसरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून एकूण १३५ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. यामध्ये १९ महिला रक्तदात्यांचा समावेश होता. रक्तसंकलनाची जबाबदारी जिल्हा शासकीय रक्तपेढी, अलिबाग यांनी सांभाळली.
शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळ, रायगड क्षेत्र सेवादलाचे क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील यांच्या उपस्थितीत निरंकार प्रभूच्या नामस्मरणाने करण्यात आले. महाड युनिट संचालक अनिल सकपाळ, जिल्हा रक्तपेढी संक्रमण अधिकारी डॉ. भैरवी मंदाडकर, तसेच भिलजी गावातील ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मिशनच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
संत निरंकारी मिशनमध्ये रक्तदान उपक्रमाची सुरुवात १९८६ मध्ये निरंकारी सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या प्रेरणेतून झाली. त्यांचा मानवतेचा संदेश—“रक्त नाल्यांमध्ये नाही, तर नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे”—आजही सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनुयायी तितक्याच समर्पणाने पुढे नेत आहेत.
शिबिराच्या यशात सेवादल व स्थानिक निरंकारी भक्तांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. सर्व रक्तदाते व मान्यवरांचे आभार भिलजी ब्रँच मुखी सुरेश गावंड यांनी निरंकारी प्रकाशन देऊन व्यक्त केले.









