अनाथ-निराधारांची ममतामयी आई सिंधुताई सकपाळ 

श्री कृष्णकुमार निकोडे

मो: ७७७५०४१०८६

४ जानेवारी, गडचिरोली: सिंधुताई सपकाळ या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या विशेषतः भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांना नुकताच २०२१मध्ये सामाजिक कार्य श्रेणीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळोंवेळी अनेक गौरवांच्या मानकरी ठरल्या. सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांतील पद्मश्री पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार, मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार, आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार, सोलापूरचा डॉ.निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार,राजाई पुरस्कार, शिवलीला महिला गौरव पुरस्कार, श्रीरामपूर अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै.सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा सामाजिक सहयोगी पुरस्कार, सीएनएन- आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला रिअल हीरो पुरस्कार, दैनिक लोकसत्ताचा सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार, डॉ.राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार, पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार आदींचा समावेश आहे.

     सिंधुताईंचा जन्म आणि त्यांचे सुरवातीचे जीवन खडतर होते. त्यांचा जन्म दि.१४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा जिल्ह्यातील पिंप्री मेघे गावात आणि ब्रिटीश भारतातील बेरार येथील अभिमन्यू साठे या गुराख्याच्या घरी झाला. एक अवांच्छित मूल असल्याने त्यांचे नाव चिंधी- फाटलेल्या कापडाचा तुकडा ठेवले. पण हीच चिंधी अनेक फाटक्या ठिगळांना जोडते, याचा त्यावेळी कोणी विचारही केला नसेल. अत्यंत गरिबी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लवकर लग्न यामुळे त्यांना चौथी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडावी लागली. त्यांचे वयाच्या बाराव्या वर्षी श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झाले, जे त्यांच्यापेक्षा तब्बल वीस वर्षांनी मोठे होते. लग्नानंतर त्या वर्ध्यातील सेलू येथील नवरगाव गावात गेल्या. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत. अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे, हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. ताईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला होता. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली. दमडाजीने सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांना कन्या जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले. हे लग्न फार काळ टिकले नाही आणि वयाच्या वीसव्या वर्षीच त्यांना त्यांच्या मुलीसोबत नवऱ्याने सोडून दिले.

    माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली. परभणी, नांदेड, मनमाड रेल्वे स्टेशनांवर त्या भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरायच्या. एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. त्या दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. परंतु तेथे त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनी २१ वर्षांच्या ताईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना तेथे कायम राहता येणार नाही. म्हणून शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठले.

   अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. सन १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. तेथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाऊ लागले. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जात असे. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत. त्यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या अशा- बाल निकेतन हडपसर, पुणे. सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, चिखलदरा. अभिमान बाल भवन, वर्धा. गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा. ममता बाल सदन, सासवड. सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने प्रदेशदौरे केले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले आहे. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे. त्यांना महानुभाव पंथाचा अनुग्रह होता. महानुभाव पंथाच्या नियमाप्रमाणे त्यांना भुमीडाग देण्यात आला.

     अशातच सिंधुताईंवर दि.२५ नोव्हेंबर २०२१ रोजी हॉस्पिटलमध्ये डायफ्रामॅटिक हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. त्यांच्यावर शस्त्रक्रियोत्तर काळजी घेण्यात येत होती. पाच वर्षांहून अधिक काळ ग्रस्त असलेल्या डायफ्रामॅटिक हर्नियामुळे त्यांचे डाव्या बाजुचे फुफ्फूस व्यवस्थितरित्या कार्य करीत नव्हते. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती थोडी बरी झाली होती. तथापि, पाच दिवसांपूर्वी त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग वाढल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दि.०४ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ८ वाजून १० मिनीटांनी त्यांचे निधन झाले. पुणे येथील गॅलक्सी केर या दवाखान्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

!! मीडिया वार्ता परिवारातर्फे स्मृतिदिनी त्यांच्या ममत्वाला व कार्यकर्तृत्वाला मानाचा लवून मुजरा !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here