रायगडात गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले

रायगडात गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले

रायगडात गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले

रायगडात गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले

रायगड पोलीस अधिक्षक कार्यक्षेत्रात गेल्या वर्षभरात २ हजार ९३३ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यातील २ हजार ९०१ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश आले.

 

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:रायगड पोलीस अधिक्षक कार्यक्षेत्रात गेल्या वर्षभरात २ हजार ९३३ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यातील २ हजार ९०१ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश आले. त्यामुळे दाखल गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ९९ टक्के झाले आहे. गेल्यावर्षी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ८६ टक्के होते. दरम्यान गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण वाढले असले तरी गुन्हे शाबितीकरणाच्या तसेच चोरीच्या गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत होण्याचा प्रमाणात गेल्या वर्षभरात घट झाल्याचे दिसून येत आहे. नवीन वर्षात यावर पोलीसांना काम करावे लागणार आहे.

गेल्या काही वर्षात वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण याचे दुष्पपरीणाम रायगड जिल्ह्यात दिसून येऊ लागले आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. चोऱ्या, घरफोड्या बरोबरच जिल्ह्यातील खून, खूनाचे प्रयत्न आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. ही एक चिंतेची बाब आहे. मात्र गुन्हेगारीचा आलेख उंचावत असतांना गुन्ह्यांची उकल होण्याचे वाढत आहे ही एक समाधानाची बाब आहे. २०२३ मध्ये गुन्हे शाबितीकरणाचे प्रमाण ६४ टक्के होते ते २०२४ मध्ये ५६ टक्क्यावर आले आहे. त्यामुळे २०२५ मध्ये गुन्हे शाबितीकरणाचा टक्का वाढावा, यासाठी पोलीसांना प्रयत्न करावा लागणार आहे.

जानेवारी २४ ते डिसेंबर २४ या कालावधीत रायगड पोलीस अघिक्षक कार्यक्षेत्रात वर्षभरात खुनाचे ३२ गुन्हे दाखल झाले, त्यापैकी ३० गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसांना यश आले. पाली आणि महाड एमआयडीसी येथील खुनाचे गुन्हे अद्याप उघडकीस आलेले नाहीत. खुनाचा प्रयत्न करण्याचे २७ गुन्हे दाखल झाले होते ते सर्व उघडकीस आले. दरोड्याचा १ गुन्हे दाखल झाले तो उघडकीस आला. जबरी चोरीच्या ३२ गुन्हे दाखल झाले हाते त्यापैकी २६ उघड झाले.

गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचे प्रमाण घटले असले तरी किरकोळ गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. यात प्रामुख्याने चोऱ्या आणि घरफोड्यांच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. वर्षभरात दाखल झालेल्या चोरी आणि घरफोड्याच्या गुन्ह्यांपैकी केवळ ४७ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश आले आहे. जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून सर्व प्रमुख शहरांमध्ये सिसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अलिबाग, रोहा, महाड, पेण शहरातील कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. मात्र तरिही चोरी आणि घरफोडी प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात पोलीसांना अपेक्षित यश मिळू शकलेले नाही.

भरतीय दंड संहिती विवीध कलमांनुसार वर्षभरात २ हजार५४० गुन्हे दाखल झाले होते त्यापैकी २ हजार १९३ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीसंना यश आले. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ८७ टक्के होते. अवैध धंदे प्रकरणात जुगाराचे ११८ गुन्हे दाखल झाले ते सर्व उघड झाले. दारूबंदीचे १ हजार ०५९ गुन्हे दाखल झाले त्यापैकी १ हजार ०४० उघड झाले आहेत.

सायबर गुन्ह्यांची व्याप्ती वाढली
राज्यातील इतर भागांप्रमाणेच रायगड जिल्ह्यातही सायबर गुन्ह्यांचा आलेख चढा राहीला. वर्षभरात ३५ सायबर गुन्ह्यांची नोंद झाली. यापैकी १२ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश आले. तर उर्वरील २३ गुन्ह्यांची उकल होऊ शकलेली नाही. या गुन्ह्यांमधील २ कोटी १७ लाख रुपयांची मालमत्ता फ्रीज करण्यात आली असून, २१ लाख २६ हजार रुपयांची रक्कम तक्रारदारांना मिळवून देण्यात पोलीसांना यश आले आहे. सायबर गुन्ह्यामधील गुंतागुंत लक्षात घेतली, तर या गुन्ह्यांचा तपास पोलीसांसाठी सर्वात आव्हानात्मक ठरतो आहे.

महिलांवरील अत्याचारांच्या प्रमाणात वाढ
गेल्या वर्षभरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. वर्षभरात बलात्काराची १०७ प्रकरणे, विनयभंगाची १५७ प्रकरणे समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे वाढले असले तरी बलात्काराच्या १०० टक्के गुन्ह्यांची तर विनयभंगाच्या ९७ टक्के गुन्ह्यांची उकल करण्यात पोलीसांना यश आले आहे. चिंताजनक बाब म्हणजे बलात्काराच्या १०७ गुन्ह्यांपैकी ७४ गुन्हे हे अल्पवयीन मलींवरील अत्याचाराशी निगडीत आहेत.

गुन्ह्यांची उकल करण्यावर आम्ही भर देत आहोत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. त्याच बरोबर गुन्हेगारी कारवायांना आळा बसावा यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईवरही भर दिला जात आहे. – सोमनाथ घार्गे , पोलीस अधीक्षक रायगड

गुन्हे उकल होण्याचे प्रमाण
सन – गुन्ह्यांची उकल

२०२० – ७९ टक्के

२०२१ – ८२ टक्के

२०२३ – ८७ टक्के

२०२४ – ९९ टक्के