मी शेतकऱ्याची लेक, बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जात आहे: सुप्रिया सुळे
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज गाझीपूरला जाऊन आंदोलन शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. शिवसेना नेते संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूरला जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर आता सुप्रिया सुळेही आज गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटून त्यांना आपला पाठिंबा देतील.
मी शेतकऱ्याची लेक आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांरोबर ज्या प्रकारे वागतंय ते पाहून दु:ख होतं. मराठीमध्ये एक म्हण आहे अन्नदाता सुखी भव: परंतु आज अन्नदाताच आंदोलन करतोय. मी केंद्र सरकारला एक विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांना न्याय द्यावा, असं सुप्रिसा सुळे यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातही एक आंदोलन झालं. अतिषय चांगल्या प्रकारे हे आंदोलन पार पडलं. केंद्र सरकार ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करतंय अशा परिस्थितीत बळीराजाला सध्या आधाराची गरज आहे. आज गाझीपूरला जाऊन मी शेतकऱ्यांशी आणि शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या…?
दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून बळीराजा ठाण मांडून बसलाय. आम्ही जरुर शहरात राहिलोय, वाढलोय, शिकलोय परंतु आमचं शेतकऱ्यांशी जे नातं आहे ते ईश्वर आणि भक्ताचं नातं आहे. शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं जातं. पण आज अन्नदाताच आंदोलनाला बसलाय. त्याच अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी एक शेतकऱ्याची लेक म्हणून मी गाझीपूरला जातेय, असं सुळे म्हणाल्या.