कलावंतांना अर्थ साहाय्यासाठी मुदतवाढ द्या…
✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी/भंडारा : कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकार व संस्थांना अर्थसाहाय्यासाठी शासनाने १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे राज्य उपाध्यक्ष तथा विदर्भ समन्वयक गणेश लिमजे, कार्याध्यक्ष सुचिता गजभिये यांनी उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांना व संस्थांना अर्थसाहाय्य देण्यात येत आहे. याचा लाभ पात्र लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. यासाठी कलावंतांना तहसील कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार असून, या अर्जाची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०२२ आहे. मात्र हा कालावधी अत्यंत कमी आहे. अनेक कलावंतांना फॉर्म उशिरा मिळाले असून, काहींना आजही फॉर्म उपलब्ध झालेले नाहीत. याशिवाय अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे मिळू शकली नसल्याने १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आहे. निवेदन देताना काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे राज्य उपाध्यक्ष तथा विदर्भ समन्वयक गणेश लिमजे, कार्याध्यक्ष सुचिता गजभिये, शहर अध्यक्ष राहुल हुमने, ज्येष्ठ कलावंत देबू मेश्राम, शरद निखाडे, ब्रिजेश रामटेके, नगरसेवक नितीन धकाते, शोएब अन्सारी, सुशीकुमार मोहबे यांच्यासह अन्य कलाकार उपस्थित होते.