जळगावातील महिला वसतिगृहात मुलींना कपडे काढून नाचायला लावले; पोलिसांवर आरोप.
जळगाव येथील महिला वसतिगृहात महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याच्या धक्कादायक प्रकाराचे पडसाद विधीमंडळात उमटले. या प्रकरणाची दखल घेत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत चार उच्चस्तरीय अधिकार्यांची समिती गठित केली आहे. या समितीचा अहवाल दोन दिवसांत प्राप्त होणार आहे. त्यानंतर दोषींवर कारवाई होईल, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आशीष अंबादे प्रतिनिधी
जळगाव:- महाराष्ट्रात महिला अत्याचार आणि शोषणाप्रकरणी मंत्र्यांची नावे चर्चेत येत असतानाच जळगावमधील महिला वसतिगृहात पोलिस प्रशासनाकडून असभ्य प्रकार घडल्याची बातमी समोर आली आहे. जळगाव शहरातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी आणि इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याबाबतची तक्रार सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. पीडित महिलांनी दिलेल्या माहितीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.
जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली आहे. तसेच या कृत्याची चित्रफीत देखील जिल्हाधिकार्यांकडे जमा करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. महिला आणि बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार आणि अन्याय, अत्याचार झालेल्या महिला आणि मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. अनेक दिवसांपासून या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या.