रायगड जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागावर पुन्हा भ्रष्टाचाराचा आरोप.
तीन हजारचा फळा 10 हजार 500ला,तर तर सात हजारला मिळणारे कपाट 22,500 ला खरेदी.
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागातील चुकीची ईनिविदा रद्द करून ती नव्याने काढायला लावणारे अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी पुन्हा एकदा महिला व बालविकास विभागातील रक्कम रू.84 लाख 91 हजार 500 चा नवा घोटाळा उघड केला असून त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पुराव्यांसहीत तक्रार दाखल केली आहे.
निर्मला कुचिक, महिला बालकल्याण अधिकारी रायगड यांनी कुठल्याही प्रकारची ई-निविदा न काढता वरिष्ठांची दिशाभुल करुन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांना दिलेल्या पुरवठा आदेशात 10,500/- रुपये प्रती नगाप्रमाणे 34 लाख 96 हजार पाचशे रुपये रकमेचे ग्रीनबोर्ड व दुस-या पुरवठा आदेशात 22,500/- रुपये प्रती नगाप्रमाणे 49 लाख 95 हजार रुपये रकमेचे कपाटे खरेदीचे पुरवठा आदेश देवुन शासनाची रक्कम रू.84 लाख 91 हजार 500 रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. सावंत यांच्या म्हणण्यानुसार अंगणवाडीसाठी लागणारा फळा हा स्थानिक बाजारात 3000/- ते 3200/- रुपयात सहज मिळतो व कपाट 7000/- ते 7500/- रुपयात मिळते. श्रीमती निर्मला कुचिक, महिला बालकल्याण अधिकारी यांनी संबंधीत संस्थेशी हातमिळवणी करुन सदरच्या वस्तु बाजारभावापेक्षा तिप्पट रक्कमेला महाग घेवुन संगनमताने आर्थिक भ्रष्टाचार केला आहे असा आक्षेप सावंत यांनी त्यांच्या पत्रात घेतला आहे.
यापुर्वीही श्रीमती निर्मला कुचिक, महिला बालकल्याण अधिकारी यांच्यावर वेगवेगळे आरोप व आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्थानिक वृत्तपत्रात आले असुन त्यावर शासन स्तरावरुन कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने सर्व सामान्य जनतेत शासना विषयी शंका घेण्यात येत आहे. तरी कृपया आपण स्वतः जातीने लक्ष देवुन सदर श्रीमती निर्मला कुचिक, महिला बालकल्याण अधिकारी, रायगड यांच्या बेकायदेषीर उदयोगांची तात्काळ चौकशी करावी व त्यांची चौकषी होईपर्यंत त्यांना तात्काळ पदावरून दुर करावे अषी विनंती सावंत यांनी शासनाकडे केली आहे.