गडचिरोलीत महिला संवाद यात्रेचा प्रारंभ

गडचिरोलीत महिला संवाद यात्रेचा प्रारंभ

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो. 8999904994

गडचिरोली:- आदिवासी समाजाच्या सशक्तीकरणासाठी आणि महिलांमध्ये आत्मभान निर्माण करण्याच्या उद्देशाने गडचिरोली येथे महिला संवाद यात्रेची सुरुवात झाली. या यात्रेचा प्रमुख उद्देश आदिवासी संस्कृतीचे संवर्धन, सामाजिक एकता आणि महिलांचे नेतृत्व विकसित करणे हा आहे.
महिला संवाद यात्रा 4 मार्च रोजी दुपारी 12 वाजता बाबुराव मडावी चौक, धानोरा रोड येथे माल्यार्पण करून सुरू झाली. या यात्रेत कुसुम अलाम, सुनिता उसेंडी, अॅड. अश्विनी उईके, प्रेमिता रामटेके यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. या यात्रेद्वारे आदिवासी समाजातील महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, सामूहिक जीवनशैलीचा पुरस्कार करणे आणि आदिवासी संस्कृतीचे जतन करणे हे मुख्य उद्देश आहेत.
यात्रेदरम्यान विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यात गोटूल व्यवस्थेला बळकटी देणे, गावातील गरजूंसाठी दानकोष व्यवस्था निर्माण करणे, मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहकार्याची परंपरा सुरू करणे, आदिवासी भाषा व इतिहासाचे जतन करणे, आदिवासी जीवनमूल्यांचा प्रचार व प्रसार करणे यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे.
गोंडवाना विद्यापीठात आदिवासी महिला अध्यासन केंद्र स्थापन करून विशेष कार्यशाळा आयोजित करण्यावरही भर देण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या न्याय आणि समतेच्या विचारांचे बळकटीकरण, पं. नेहरूंच्या पंचसूत्रीच्या माध्यमातून आदिवासी विकासाला चालना देणे आणि महात्मा गांधींच्या आत्मनिर्भर समाज संकल्पनेचा प्रचार करणे यासारख्या उद्दिष्टांवरही या यात्रेत भर दिला जाणार आहे.
महिला संवाद यात्रेच्या माध्यमातून आदिवासी महिलांचा आत्मविश्वास वाढेल, त्यांच्या विचारांना दिशा मिळेल आणि समाजाच्या सर्वांगीण विकासात त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
यात्रेला मार्गदर्शन आणि विशेष सहकार्य माधर गावळ , अॅड. लालसू नागोटी, अनिल केरामी मुकेश नरोटे यांनी दिले.
ही यात्रा जिल्ह्यात मोठा प्रभाव निर्माण करत असून महिलांनी तन-मन-धनाने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.