नळ जोडणीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवावा : पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर पावसाळ्यापूर्वी पाणी टंचाई निवारण्याची कामे पूर्ण करावी जिल्ह्यात कुठेही कृत्रिम पाणी टंचाई निर्माण न होऊ देण्याचे निर्देश

नळ जोडणीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवावा : पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर

पावसाळ्यापूर्वी पाणी टंचाई निवारण्याची कामे पूर्ण करावी
जिल्ह्यात कुठेही कृत्रिम पाणी टंचाई निर्माण न होऊ देण्याचे निर्देश

नळ जोडणीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कालबध्द कार्यक्रम राबवावा : पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर पावसाळ्यापूर्वी पाणी टंचाई निवारण्याची कामे पूर्ण करावी जिल्ह्यात कुठेही कृत्रिम पाणी टंचाई निर्माण न होऊ देण्याचे निर्देश

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर:9860020016

अमरावती दि 2: जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यात उद्भवणारी पाणीटंचाईच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी आणि नळजोडणीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यक्रम आखावा. शासकीय यंत्रणांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून नवीन कामाचे प्रस्ताव तात्काळ सादर करावे व प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करण्यात यावा. पावसाळ्यापूर्वी टंचाई निवारणाची कामे पूर्ण करण्यात यावी. असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी दिले.

श्रीमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन, ग्रामीण पाणीटंचाई व रोजगार हमी योजनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या.

आढावा बैठकीला आमदार राजकुमार पटेल, बळवंतराव वानखेडे, देवेंद्र भुयार, प्रताप अडसड, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी पवनीत कौर, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यात पंडा, मोर्शीचे प्र. उपविभागीय अधिकारी मंदार पत्की, उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार व संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सत्तर गाव योजनेअंतर्गत तातडीने प्रस्ताव सादर करावे

सत्तर गाव योजने अंतर्गत ज्या गावांचा प्रस्ताव अद्याप सादर झाला नाही त्यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करावा. खानापूर व पिपळखुंटा या गावांमध्ये पाणी टंचाई निवारण्यासाठी या दोन गावांचा समावेश सत्तर गाव योजनेत करून घ्यावा. जिल्ह्यातील कुठल्याही गावात प्यायच्या पाण्याची टंचाई होता कामा नये. असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.

पाणीपुरवठा योजनेत सर्व गावांचा समावेश करावा

जिल्हा परिषद जलजीवन मिशन अंतर्गत 110 कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आला असून त्यात 861 गावांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेकडे पाणीपुरवठा विषयक 5 कोटीच्या योजना आहेत. काही गावांचा समावेश यात करून घेण्याचे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. पाणीपुरवठा कामाच्या वर्गवारी तीन नुसार 624 गावांमध्ये प्रस्तावित कामे सुरू असल्याची माहिती संबंधितांनी दिली.

रेट्रोफिटिंग अंतर्गत येणारी कामे तात्काळ पूर्ण करावी

जिल्ह्यात 100 टक्के नळजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी रेट्रो फिटिंग अंतर्गत करण्यात येणारी कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी. आवश्यक तेथे पाईपलाइन टाकण्यात यावी, गरजेच्या ठिकाणी त्यात सुधारणा करण्यात याव्या. असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले.

कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होता कामा नये

ज्या भागात पाणीपुरवठासाठी उपाययोजना करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे तेथे पाण्याचा मुख्य स्रोत, जागेची पाहणी, भुवैज्ञानिकांकडून सुचविण्यात आलेल्या बाबी व अहवाल, तांत्रिक बाबींची पूर्तता आदी तात्काळ सादर करण्यात याव्या. पाण्याचे स्त्रोत असलेल्या ठिकाणी पुरेशा विहीरी निर्माण करण्यात याव्या. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील 14 तालुक्यातील1985 गावांसाठी प्रस्तावित बोअरवेलची माहिती तात्काळ सादर करण्यात यावी,असे निर्देश त्यांनी दिले.

पाणीपुरवठा योजनेचा सर्वसमावेशक आराखडा तयार करावा

विंधन विहिरीच्या निर्मिती बाबत निविदा प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. आराखडा तयार करताना सर्व गावांचा त्यात समावेश करावा. चांदुर रेल्वे तालुक्यातील बोरवेलचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून तेथील 11 गावांपैकी 7 गावांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. इतर ठिकाणी तात्पुरती नळ दुरुस्ती प्राधान्याने करण्यात यावी असे श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

पाणीटंचाई असलेल्या गावात टँकरने नियमित पाणी पुरविण्यात यावे

जिल्ह्यातील शहानुर, विश्रोळी प्रकल्पाचे पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती श्रीमती ठाकूर यांनी घेतली. पुढील 30 वर्षांसाठी पाणीटंचाई होणार नाही असा सुधारित आराखडा तात्काळ सादर करावा.भातकुली तालुक्यातील काकलखेडा खोलापूर येथील वस्त्यापर्यंत अति टंचाई असलेल्या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात यावा. पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत उपपययोजना कराव्यात, असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. धारणी, चिखलदरा तालुक्यातील पाणी टंचाई योजनेबाबतची प्रलंबित देयके निकाली काढण्यात यावी असे सांगितले.

मनरेगा अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांची संख्या वाढविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करावे

रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांची संख्या वाढवावी. कुशल मध्ये प्राप्त निधीचा शंभर टक्के वापर करावा. शेतनिर्माण, पांदण रस्ते, बांबू लागवड, अंगणवाडी बांधकाम, शाळेत विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधांची निर्मिती करण्याचे निर्देश महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेतांना श्रीमती ठाकूर यांनी दिले.