हेमंत गोडसे यांच्या विजयच्या हॅट्रिकला अनिल जाधव लावणार ब्रेक?
ज्ञानेश्वर तुपसुंदर
नाशिक तालुका प्रतिनिधी
मो. ८६६८४१३९४६
नाशिक : नाशिक लोकसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार याचे आता संकेत मिळू लागले आहेत. राज्यातील इतर जागांप्रमाणे भाजप नाशिकच्या जागेसाठी आग्रही होता, ही जागा भाजपला मिळाली नाही म्हणून आता भाजप कार्यकर्ते आक्रमक असून भाजपचे अनिल जाधव हे नाशिक लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल जाधव यांनी सांगितले की, महायुतीमध्ये आमचं गटबंधन शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या सोबत आहे, मागील दोन पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी ने शिवसेनेला संधी दिली होती, आता नाशिक लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीने मागितला होता, नाशिक लोकसभा मतदारसंघात आमचे ३ आमदार व महानगरपालिका व नगरपालिकेमध्ये सत्तरहून अधिक नगरसेवक आहेत. आमची ताकद जास्त असतानाही महायुतीमध्ये नाशिक लोकसभेची जागा मात्र शिवसेनेला गेली, मात्र मतदार संघात खासदार सोडला तर शिवसेना शिंदे गटाचे अस्तित्व मतदार संघात काहीच नाही, शिवसेनेला गेल्या दहा वर्षात दोन वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आता शिवसेनेने स्वतःहून थांबायला हवं होतं, कारण दहा वर्षात मतदार संघात त्यांना योग्य प्रकारे विकास कामे करता आली नाही. जातीय समीकरणामुळे ओबीसी बांधव हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज आहेत. हेमंत गोडसे यांच्या विरोधात आता नाशिक शहरात बॅनर झळकू लागले आहेत. त्यामुळे हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीचा मार्ग कठीण आहे.
केंद्रात भाजप महायुतीचे सरकार असतानाही खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकचा काहीही विकास केलेला नाही, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघ भाजपने लढवायला हवा, म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी नाशिक लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. अजूनही वेळ गेली नाही, भारतीय जनता पार्टीचा मी पुरस्कृत उमेदवार होऊ शकतो. जर मी पुरस्कृत उमेदवार झालो तर महायुतीचा धर्म म्हणून हेमंत गोडसे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन मला पाठिंबा द्यावा, असे भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल जाधव यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.