बुलढाणा, धुळ्यासारखे अपघात टाळायचे असतील तर नियम पाळा अपघात टाळा!
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मुंबई ते नागपूर प्रवासातील अंतर कमी करण्यासाठी तसेच मराठवाडा विदर्भाच्या विकासाला चालना मिळावी यासाठी समृद्धी महामार्ग निर्माण करण्यात आला आहे. पण हाच महामार्ग आता मृत्यूचा मार्ग बनत चालला आहे नागपूरहून पुण्याला येणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल बसला बुलढाणा सिंदखेडराजा दरम्यान भीषण अपघात झाला या अपघातात बसला आग लागली आणि त्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली. या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला.
अर्थात समृद्धी महामार्गावरील हा पहिला अपघात नाही गेल्या १०० दिवसात या महामार्गावर तब्बल ९०० अपघात झाले आहेत याचाच अर्थ या महामार्गावर दररोज सरासरी ९ अपघात होतात. या अपघातात आतापर्यंत शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे तर हजारो प्रवासी जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गावरील वाढते वाहन अपघात चिंताजनकच आहे. कोणतेही टोकदार वळण किंवा अडथळा नसलेला हा विस्तीर्ण आणि चकचकीत असलेला हा महामार्ग आहे तरीही त्याच्यावर इतके अपघात कसे होतात याचे आश्चर्य वाटते. केवळ समृद्धी महामार्गावरच नाही तर देशातील सर्वच महामार्गावर आणि रस्त्यांवर दररोज अपघात होतच असतात या रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. देशात सर्वात जास्त मृत्यू अपघातात होतात. अपघातात जखमी आणि कायमचे जायबंदी होणाऱ्यांची संख्या तर अगणित आहे. विशेष म्हणजे यात तरुणांचा समावेश अधिक आहे. ज्या तरुणांच्या जोरावर आपण महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहोत त्याच तरुणांचे अपघातात निधन होत असेल तर ती देशाची मोठी हानी आहे. अनेक प्रयत्न करूनही देशातील रस्ते अपघातांची संख्या का कमी होत नाही हा संशोधनाचा विषय आहे.
वाढत्या रस्ते अपघातांना जितकी व्यवस्था जबाबदार आहेत तितकीच मानवी चुकाही जबाबदार आहेत. टोलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची वसुली केली जात असतानाच महामार्गावर जीवघेण्या ब्लॅकस्पॉट मध्ये सुधारणा होत नाही. त्याचप्रमाणे रस्त्यांवरील खड्डे, धुळीचे साम्राज्य, महामार्गावरील अतिक्रमणे, सर्व्हिस रोडचा अभाव, रस्त्यावरच उभी केली जाणारी अवजड वाहने, बंद पडलेल्या वाहनांसाठी कमी पडत असलेली मदत केंद्रे, मोकाट जनावरे, अपुरे दुभाजक याबाबी अपघातांसाठी कारणीभूत ठरत आहेत. महामार्गावर वाहन चालकांकडून वेग मर्यादा पाळण्यात येत नाही. बहुतेक प्रवासी १०० किमी पेक्षा अधिक वेगाने वाहने चालवतात. ट्रक व इतर मोठ्या वाहनांकडून लेनची शिस्त पाळली जात नाही.
काही वाहन चालक तर दारु पिऊन वाहने चालवतात तर काही वाहन चालक वाहन चालवत असताना मोबाईलवर बोलतात. वाहनांची व्यवस्थित निगा न राखणे, सीट बेल्ट न लावणे या गोष्टीही अपघातास कारणीभूत ठरतात. नियम माहीत असूनही चालक त्यांचे पालन करत नाहीत. सगळ्यांनाच कमी वेळात आपले ठिकाण गाठायचे असते. नियमांचे पालन न केल्यानेच अपघातांची संख्या कमी होत नाही. अपघातांची संख्या कमी करायची असेल तर वाहन चालकांना नियमांचे पालन करावेच लागेल. नियम पाळा अपघात टाळा!