पेरण्या रखडल्या, जून गेला कोरडा…

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

जून महिना संपला तरी राज्यात पावसाने म्हणावा तसा जोर धरलेला नाही. राज्यातील बहुतांश भागात जून महिना कोरडाच गेला आहे. मान्सूनपूर्व पावसानेही दगा दिला आहे. जून महिन्यात सरासरी इतकाही पाऊस झाला नाही त्याचा विपरीत परिणाम पेरण्यांवर झाला आहे. जून महिन्यात सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस झाला नाही.

देशात सर्वात कमी पाऊस मराठवाड्यात झाला आहे. मराठवाड्यावर वरून राजाची कायमच वक्रदृष्टी राहिली आहे. मृग नक्षत्र कोरडे गेले. आदरा नक्षत्रात काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी नक्षत्र संपेपर्यंत दमदार पाऊस होईल की नाही याची शाश्वती देता येत नाही त्यामुळे पेरण्या करण्यास बळीराजा धजावला नाही परिणामी मराठवाड्यात फक्त एक टक्का पेरण्या झाल्या आहेत. राज्यातील इतर भागातही जवळपास हीच परिस्थिती आहे. बळीराजा पावसाचा अंदाज घेऊन पेरण्यांचे नियोजन करत आहे. मात्र ज्यांनी पेरण्या केल्या ते वरुण राजाला विनवणी करत आहेत. कारण वेळीच आणि पुरेसा पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढवू शकते.

गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने या काळापर्यंत बहुतेक ठिकाणी पेरण्या पूर्ण झाला होत्या. यावर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने कपाशी, धान, सोयाबीन, कडधान्ये या मुख्य पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत. पेरण्या रखडल्याने बळीराजा चिंतेत असला तरी समाज आणि प्रशासनाला त्याचे काही सोयरसुतक दिसत नाही. बळीराजा आभाळाकडे नजर लावून बसला असताना राज्यातील लोक आणि प्रशासन यंत्रणा मात्र हातात रिमोट घेऊन टीव्हीवर राजकीय महानाट्य पाहण्यात मग्न आहेत. पाऊस पडला काय आणि नाही पडला काय आपल्या जीवनात काय फरक पडतो. अशा आविर्भावातच सर्वजण वागत आहेत. मात्र पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पेरण्या रखडल्या तर बळीराजालाच नव्हे तर सर्वांनाच बसणार आहे.

पाऊसपाण्याची वेदना केवळ बळीराजाची वाटत असली तरी प्रत्यक्ष तिचे व्यापक परिणाम होत असतात. उत्पादन कमी झाले तर अन्नधान्याच्या किंमतीवर त्याचा परिणाम होत असतो आणि सगळ्यांनाच महागाईचा सामना करावा लागतो. सर्वसामान्य आणि नोकरदारवर्गाची आर्थिक कुचंबणा होते. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण होते. याउलट जर पाऊस चांगला झाला, वेळेवर पेरण्या झाल्या, भरघोस पीके आली तर त्याचा बाजारपेठेवर आणि एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा चांगला परिणाम होतो. सरकारलाही विकास कामांसाठी पैसा उपलब्ध होतो. बळीराजाचे नुकसान झाले की सारकरला त्यांना नुकसानभरपाई द्यावी लागते त्यामुळे विकास कामांना कात्री लागते. एकूणच पावसाअभावी पेरण्या रखडल्या तर त्याचा खूप दूरगामी परिणाम होतो. हा परिणाम केवळ बळीराजवरच नाही तर समाजातील सर्व घटकांवर होतो.

त्यामुळेच आता जुलै महिन्यात तरी वरुण राजाने कृपा करावी असे साकडे बळीराजा वरुण राजाला घालत आहे. जर वरुण राजाने कृपा केली नाही आणि जुलै महिना जून महिन्याप्रमाणेच कोरडा गेला तर बळीराजा हतबल होईलच पण त्याचा परिणाम राज्याचा अर्थव्यवस्थेवर देखील होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here