याला सत्तालालसा म्हणायची की अजून काही?

100

याला सत्तालालसा म्हणायची की अजून काही?

अंकुश शिंगाडे

मो: ९३७३३५९४५०

 दोन दिवसापुर्वी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षबदल झालेला आढळला. त्यानुसार असं दिसलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस मधून फुटून पक्षासह भाजपा व शिंदे गटाला मिळाले. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपदही मिळालं. विशेष सांगायचं म्हणजे महाराष्ट्र राज्य पाहिजे त्या प्रमाणात विशाल नसतांना व त्या प्रमाणात एक उपमुख्यमंत्री पद असतांना दोन उपमुख्यमंत्रीपदाची आवश्यकता नव्हतीच. परंतु हव्या तेवढ्या पार्ट्या व त्या पार्ट्यांचं पक्षीय बलाबल व तेवढेच महत्व पाहून आपल्याला कितीतरी उपमुख्यमंत्रीच पद नाही तर अशी कितीतरी पदं निर्माण करता येतात हे त्यावरुन सिद्ध झालं. 

           हे प्रकरण. याला सत्तालालसा म्हणायची की अजून काही? हा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. त्यातच या पार्ट्यांवर कोणालाही टिका करण्याचा अधिकार नाही आणि मी टिकाही करीत नाही. कारण हे राजकारण आहे. राजकारणात व युद्धात हे चालायचंच. 

          मागे असाच एक प्रकार झाला. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला. त्यानंतर बरंच वादळ उठलं. धनुष्यबाणाचा वाद चव्हाट्यावर आला. शिवसेना नेमकी कोणाची? शिंदेची की उद्धवची. त्यानंतर न्यायालयीन लढाई झाली व शिंदे गट जिंकला. कारण न्यायालयाचा तो निकाल. तसंच आता राष्ट्रवादीतही होणार की काय अशी चिन्हं दिसत आहेत. नेमकं घड्याळ चिन्हं कोणाला व राष्ट्रवादी नेमकी कोणाला?

            हेच घडलं होतं काही दिवसांपुर्वी. जेव्हा शरद पवार काँग्रेसमधून फुटले होते व त्यांनी नवीन पक्ष काढला होता. ज्याचं नाव ठेवलं होतं राष्ट्रवादी. तसं पाहता त्या पक्षानं बरंच कार्य केलं. कारण शरद पवारांची पकड होती. तसंच या पक्षानं बरेचदा भुमिका वेळोवेळी बदलाची घेतली. जसं काँग्रेसमधून बाहेर पडून मंत्रीमंडळ स्थापन होताच काँग्रेसला पाठींबा देणे. सेना भाजप कट्टर शत्रू असतांनाही सेनेला पाठींबा देणे. एवढंच नाही तर अगदी रात्रीलाच आपला उपमुख्यमंत्री जाहीर करुन लोकांना माहितीही पडायच्या पुर्वी त्या पदाचा शपथविधी होणे. या सर्व गोष्टीला काय म्हणावे? आता मात्र नवीनच फॅड अस्तीत्वात येत आहे. पक्षबदल करणे आणि जुन्या पक्षाच्या पक्षरणनीतीवर आपला अधिकार सांगत त्या पक्षाची चिन्हं आणि रणनीतीही मागणे. त्यात न्यायालयीन दावाही करणे. त्यासाठी जनतेला मात्र विश्वासात न घेणे. जनतेला काय करायचं? ती म्हणते की तुम्ही लढा. पक्षबदल करा. मोठमोठी पदं घ्या. आम्हाला त्याचं काही करायचं नाही. फक्त आमची कामं इमानदारीनं करा म्हणजे झालं. 

             आता यात जनतेचं काय चुकतं? काहीच नाही. तरीही हे राजकीय नेते जनतेचाच पैसा खातात. याच जनतेच्या पैशातून कितीतरी मालमत्ता जमवतात. साध्या सामान्य माणसावरुन मोठमोठे प्रवास करीत मंत्रीपदं मिळवतात आणि जेव्हा मंत्रीपद मिळतं, तेव्हा तू सामान्य माणसांचा विचार करीत नाहीत. त्यांना अगदी विसरुन जातात. हे घडत आलं आहे आजवर. मग त्यांना आठवण तेव्हाच येते. जेव्हा निवडणूक जवळ येते. आता मंत्रीपद मिळाल्यावरची व तो जेव्हा सामान्य कार्यकर्ता होता तेव्हाची परिस्थिती पाहिली तर किती फरक दिसतो याची कल्पना न केलेली बरी. कितीतरी फरक असतो त्यात. तो जेव्हा सामान्य कार्यकर्ता असतो, तेव्हा किती पैसा व मालमत्ता असते त्यांच्याजवळ व तोच जेव्हा मंत्रीपद मिळवतो. तेव्हा किती पैसा व मालमत्ता असते यांचा विचार न केलेला बरा. तो जेव्हा सामान्य कार्यकर्ता असतो. तेव्हा त्यांच्याजवळ मालमत्ता व पैसाही जास्त नसतोच आणि तो जेव्हा मंत्रीपद मिळवतो. तेव्हा त्या मालमत्तेत कितीतरी प्रमाणात वाढ झालेली असते. हा पैसा व ही एवढी मोठी मालमत्ता कोठून येते? यावरच उपाय म्हणून सरकारनं चांगलं पाऊल उचललं आहे. इडी लावली आहे. ही इडी प्रत्येक अशा लोकांचा शोध घेत आहे व प्रत्येकाची चौकशी करीत आहे. आता यात काही लोकं विद्यमान सत्तेशी हातमिळवणी करीत आहेत. परंतु यात महत्वाचं सांगायचं म्हणजे असे लोकं कुठपर्यंत पळतील? कारण हा पैसा जनतेच्या काबाडकष्टाचा आहे. घामाचा आहे. जो त्यांनी कर स्वरुपात भरला आहे. बिचारे दिवसरात्र काबाडकष्ट करतात नव्हे तर अपार मेहनत करतात. बसून राहात नाहीत. 

          महत्वाचं सांगायचं म्हणजे सत्तांतर करावं. करु नये असं नाही. पद मिळवावं. मिळवू नये असं नाही. परंतु यात देशहितही पाहावं. याबाबत दोन उदाहरणं अशी. आपल्याला माहीत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर कितीतरी मराठे सरदार स्वराज्य सोडून औरंगजेबाच्या शामियानात दाखल झाली होते. कारण शिवरायांनी वतनदारी पद्धत बंद केली होती व औरंगजेबाकडे ती पद्धत सुरु होती. त्यातच बादशाहाचं बलाबल वाढलं होतं. परंतु त्यामुळं खरंच स्वराज्य मिटलं का? नाही, स्वराज्य मिटलं नाही. त्या स्वराज्यात उरलेल्या दोन चार इमानदार माणसांनी स्वराज्य राखलं. महाबलाढ्य असलेल्या औरंगजेबाला शह दिला नव्हे तर या देशातून समुळ बादशाहीच नामोहरण केली. त्यासाठी त्यांनी सामान्य लोकांचा विश्वास संपादन केला. दुसरं उदाहरण महाभारताचं देता येईल. महाभारतात कौरव पक्षात कितीतरी मातब्बर सेनानी होते की त्यांचा पराभवच करता येत नव्हता. तरीही पांडव जिंकले. का? तर त्यांच्या पाठीमागं प्रत्यक्ष देव होता. 

            आजही तीच गत होत आहे. ही बादशाही नसली तरी. सत्तालालसा आपल्याला वेड लावत आहे. परंतु सत्ता ही महत्वाची नाही. कोणतंही पद हे महत्वाचं नाही. कारण कोणतंही पद वा सत्ता या शाश्वत नसतात. जिथं आपल्या आयुष्याचाच विश्वास नाही. केव्हा मरण येईल हे सांगता येत नाही. तीच गत सत्तेची आहे. विशेष सांगायचं म्हणजे पद घ्यावं. सत्ताही मिळवावी. परंतु लोकांचा विश्वास संपादन करुन. जर लोकांच्या मनात तुमच्याबद्दल विश्वास उरला नाही ना, तर ती सामान्य जनता आहे. तीच जनता उद्या जावून तुम्हाला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. मग बोंबलत राहावं लागेल. महत्वाचं म्हणजे आपलं चांगलं वागणं जनता पाहात नसते आणि आपलं वाईट वागणंही जनता पाहात नसते. तो देव पाहात असतो. तोच देव आपल्या चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब ठेवत असतो. जो देव जनतेतच वावरतो. त्यातच जेव्हा वेळ येते. तेव्हा हाच देव आपल्याला धुळीस मिळवत असतो. मग विचार करायलाही वेळ मिळत नाही. त्यासाठी तुर्तास आज तसा विचार प्रत्येकांनी करावा. आपलं काय चुकत आहे ते पाहावं व त्यानुसार आपण वागावं. आपला आजचा दिवस गोड मानून घेवू नये. उद्याचा विचार करावा. विचार करावा की आपल्या पुर्वजांनी बलिदान दिलं. ते मोघलांशी लढले. इंग्रजांशी लढले. यासाठी नाही की त्यांच्या बलिदानानंतर फक्त दोनचार लोकांनाच आपली पोळी शेकता येईल. सामान्य जनतेला नाही.

           महत्वाचं सांगायचं म्हणजे आयुष्य हे फार सुंदर आहे. त्या आयुष्याला अधिक सुंदर बनवावं. तसा आपण विचार करावा. त्यासाठी केवळ आपलीच पोळी शेकून चालणार नाही. इतरांनाही त्यांची पोळी शेकू द्यावी म्हणजे मिळवलं. एवढंच हात जोडून सांगणं आहे. तसंच आवर्जून सांगायचं म्हणजे राजकीय नेत्यांनी सत्तांतर अवश्य करावं. परंतु आपल्या सत्तांतरामध्ये सामान्य जनतेचे हाल करु नये म्हणजे झालं.