स्टंटबाजी करून नागरिकांमध्ये भीती पसरवण्याच्या उद्देशाने तीन तरुणांनी बसमध्ये बसलेल्या एका महिलेवर तलवारीने हल्ला केला
त्रिशा राऊत
नागपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो 9096817953
नागपूर : स्टंटबाजी करून नागरिकांमध्ये भीती पसरवण्याच्या उद्देशाने तीन तरुणांनी बसमध्ये बसलेल्या एका महिलेवर तलवारीने हल्ला केला.ही महिला महापालिकेच्या ‘आपली बस’मधून प्रवास करत होती. अपोरींनी चालत्या बसवर हल्ला केला. गुन्हे शाखेच्या पथकाने तीन तासांत स्टंटबाजांना अटक केली. अभिजीत यादव (24, रा. मानकापूर), मोहम्मद जैद सिकंदर शेख (18) असे अटकेत असलेले आरोपीचे नाव आहे. त्यांचा तिसरा साथीदार रोहित उर्फ करण नौकारिया (19, रा. मानकापूर) हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अभिजीत, मोहम्मद जैद आणि रोहित हे तिघेही दुचाकीवर होते. दारूच्या नशेत हे लोक रस्त्यावरील लोकांना तलवारी दाखवून स्टंट करत होते. या आरोपींनी दारूच्या दुकानाचीही तोडफोड केली. त्यानंतर भीती पसरवण्यासाठी त्यांनी महिलेवर हल्ला केला. फिर्यादी सोनाली श्रीवास्तव (वय 39, रा. गोधनी रेल्वे) यांनी घरी जाण्यासाठी बस पकडली. नागपूर महानगर पालिका ‘आपली बस’ क्रमांक एमएच-40-बीएल-3924 हे मोती महल हॉटेल, सदर, नागपूर येथून गोधनी बसस्थानकाकडे घरी परतत होते.दुपारी 4.15 ते 4.30 च्या दरम्यान बस पागलखाना चौक येथे सिग्नल ओलांडत होती. त्यावेळी तीन आरोपी दुचाकीवरून आले आणि दुचाकीच्या मागे बसलेल्या एका व्यक्तीने बसच्या बाहेरून खिडकीतून बसमध्ये तलवार फेकली. त्यांना काही समजण्यापूर्वीच त्यांनी महिलेवर तलवारीने वार करून तिला रक्तबंबाळ केले आणि तेथून पळ काढला. काही अंतरावर बस थांबली.
चालक व वाहकाच्या मदतीने महिलेवर उपचार करण्यात आले. त्यांनी पोलिस स्टेशन गाठून संपूर्ण प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. फरार आरोपी रोहितचा पोलीस शोध घेत आहेत.