अखेर… मार्च 2020 भरती प्रक्रियेतील पोलीस उपनिरीक्षकांची मेरीट लिस्ट प्रकाशित, अखेर आ. किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश
अश्विन गोडबोले
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
मो: 8830857351
मुंबई ,4 जुलै: वर्ष 2020 ला पोलिस उपनिरिक्षक पदाकरिता झालेल्या परिक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला नव्हता हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने निकाल जाहिर करण्यास विलंब होत होता. परिणामी या परिक्षा देणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य धोक्यात आले होते. याची दखल घेत न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून सद्यास्थितीत योग्यता यादी लावण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. या मागणीची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असुन पोलीस उपनिरीक्षकांची तात्पुरती योग्यता यादी प्रकाशित केली आहे.
मार्च 2020 ला राज्य शासनाच्या वतीने पोलिस उपनिरिक्षक पदाकरिता जाहिरात प्रकाशित करण्यात आली पूर्व परीक्षा घेण्याकरिता कोरोना महामारी व मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याच्या कारणामुळे उशीर झाला. त्यानंतर पूर्व मुख्य, शारीरिक चाचणी व मुलाखत संपन्न झाल्यात. परंतु जाहिरातीच्या वेळी मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण रद्द झाल्यामुळे राज्य शासनाने शासन निर्णय काढून एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुला प्रवर्ग किंवा पात्र असल्यास ई डब्लु एस प्रवर्गात अर्ज सुधारणा करण्याचा शासन निर्णय प्रकाशित केला. परंतु या शासन निर्णयाविरुद्ध काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधीकरणाकडे धाव घेतली त्यानंतर सदर शासन निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधीकरणे रद्द केला. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाच्या या निर्णयाविरोधात राज्य शासन उच्च न्यायालयात गेले. त्यामुळे हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीची दखल
परिणामी या परीक्षेचा अंतिम निकाल राखून ठेवलेला होता. निकाल प्रलंबित असल्यामुळे या उमेदवारांपूढे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच वर्ष 2021 व 2022 ची भरती प्रक्रिया सुद्धा त्यामुळे प्रलंबित राहिलेली होती. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेत न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून सद्यास्थितीत तात्पुरती योग्यता यादी लावण्यात यावी आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय येईल त्यावेळेस तात्पुरता व अंतिम निकाल जाहिर करण्यात यावा अशी मागणी यावेळी आ. जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली होती. या मागणीचा आ. जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने पाठपूरावाही सुरु होता. अखेर या पाठपूराव्याला यश आले असुन 2020 भरती प्रक्रियेतील पोलीस उपनिरीक्षकांची तात्पुरती योग्यता यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे आ. जोरगेवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.