सारळ खाडीवरील पूलाची दूरावस्था
सावित्री नदी दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
अँड.रत्नाकर पाटील रायगड ब्यूरो चीफ ९४२०३२५९९३
अलिबाग:-अलिबाग-रेवस मार्गावरील सारळ खाडीवर असलेल्या पूलाची दूरावस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे हा पूल निधीच्या कचाट्यात सापडला आहे. येथे नवीन पूल उभारण्याची गरज असताना चार वर्षांपूर्वी केलेल्या दुरुस्तीच्या जोरावर पूलावरुन वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. नवीन पूल उभारण्यासाठी दीड कोटी निधीची आवश्यकता आहे. जुना पूल अत्यंत जीर्ण झाला असल्याने येथे सावित्री नदी दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अलिबाग-रेवस मार्गावरील सारळ खाडीवर १९८० मध्ये दगडी पुलाचे बांधकाम करण्यात आले. ४५ वर्ष हा पूल लाटांचा मारा सहन करीत उभा आहे. सद्यस्थितीत या पूलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यामुळे सारळ पूलाचा सावित्री पूल होतो की काय? अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. येथे नवीन पूल बांधण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे.
मात्र येथे नवीन पूल उभारण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे अडचण निर्माण झाली आहे. येथे नव्याने पूल बांधण्यासाठी एक प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला होता. त्यानुसार नवीन पूल उभारण्यासाठी नाबार्डने पाच वर्षांपूर्वी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार निवीदा प्रक्रियाही पार पडली. त्यानंतर समुद्राच्या बाजूला पूल उभारण्यात येत असल्याने त्याचे फाउंडेशन मजबूत असावे अशी उपरती सार्वजनिक बांधकाम विभागाला झाली. त्यामुळे मजबूतीने हा पूल उभारण्यासाठी जवळपास दीड कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा प्रस्ताव तयार करुन तो सरकार दरबारी सादर केला आहे.
दरम्यान, नवीन पूल बांधण्यात येई पर्यंत जुन्या पुलावरूनच वाहतूक ठेवावी लागणार होती. यामुळे जुना पूल मजबुत करण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला. त्यानुसार चार वर्षांपूर्वी पूलाची डागडुजी करून पूलाचे मजबुतीकरण करून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र नवीन पूल उभारण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे सावित्री नदी दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
……………..
सवित्री पुल दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
मुंबई-गोवा महामार्गावरील महाड, पोलादपूर तालुक्यांना जोडणारा ८८ वर्ष जुना पूल सावित्री नदीला आलेल्या पुरात वाहून गल्याची घटना २ आगस्ट २०१६ रोजी घडली होती. या दुर्घटनेत दोन एस.टी.बससोबत एक चारचाकी वाहन नदीच्या प्रवाहात वाहून गेले होते. यामधील २८ जणांचे मृतदेह सापडले तर ९ जणांचे मृतदेहांचा शोध लागला नाही. यानंतर जिल्ह्यातील सर्वच जुन्या पूलांचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र या दुर्घटनेनंतर ही सार्वजनिक बांधकाम विभागाने बोध घेतला नसल्याचे दिसून येते. सारळ खाडीवर असलेल्या जीर्ण पुलावरून वाहतूक सुरू असल्याने सावित्री नदी दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
………………