महाराष्ट्राला समृद्ध करणारे कलावंत हरपले… 

51

महाराष्ट्राला समृद्ध करणारे कलावंत हरपले…                 

बुधवार आणि गुरुवार असे सलग दोन दिवस महाराष्ट्रासाठी घातवार ठरले कारण बुधवार आणि गुरुवार या दोन्ही दिवशी मराठी मातीला आणि महाराष्ट्राला आपल्या उत्तुंग कलाकृतीने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या दोन महान कलावंताचे निधन झाले.

बुधवारची सकाळ उजाडताच महाराष्ट्राला धक्कादायक बातमी समजली ती म्हणजे आधुनिक युगाचा विश्वकर्मा अशी ओळख असलेला सिनेसृष्टीतील प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आकस्मिक निधनाची. नितीन देसाई यांनी त्यांच्या एन. डी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमीने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला कारण त्यांच्यासारखा लढवय्या कलाकार असे टोकाचे पाऊल उचलेल असे कोणालाही वाटले नाही. नितीन देसाई कला क्षेत्रातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व. सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या नितीन देसाई यांचा प्रवास तसा थक्क करणारा.

एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्म घेऊन बॉलिवूड मध्ये स्वतःच वेगळं स्थान निर्माण करणारा हा उमदा कलाकार नवोदित कलाकारांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत राहिला आहे. हिंदी चित्रपटात जे भव्यदिव्य सेट आपण पाहतो त्या सेटची निर्मिती हेच नितीन देसाई करायचे. नितीन देसाई यांचे चित्रपटातील भव्यदिव्य सेट पाहून हे सेट मराठी माणसाने उभारले असतील यावर विश्वासच बसत नसे. हम दिल दे चुके सनम, देवदास, मुन्नाभाई एमबीबीएस, १९४२ ए लव्ह स्टोरी, परींदा, प्रेम रतन धन पायो, ट्राफिक सिग्नल, फॅशन, जोधा अकबर, मंगल पांडे, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, बालगंधर्व, केबीसी, बिगबॉस, चाणक्य तमस, जंगल बुक, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यासारखे चित्रपट आणि मालिकांचे सेट नितीन देसाई यांनीच उभारले होते इतकेच नाही दिल्लीत होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या महाराष्ट्राच्या चित्र रथाची निर्मितीही त्यांनी अनेकदा केली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.

कलाकार म्हणून ते श्रेष्ठ होतेच पण माणूस म्हणूनही ते तितकेच श्रेष्ठ होते त्यांनी अनेक तरुण कलाकारांना मोठे केले. खरं तर त्यांचं काम खूप मोठं आहे. शंभरहून अधिक चित्रपट, मराठी, हिंदी मालिका, स्टेज शो, असंख्य जाहिराती अशी त्यांच्या कामाची यादी वाढतच जाणारी आहे म्हणूनच त्यांच्याविषयी मराठी माणसाच्या मनात एक आदराची भावना होती त्यामुळेच त्यांचे असे आकस्मिक निधन मराठी माणसांसाठी धक्कादायक होते. त्यांच्या निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत नाही तोच गुरुवारी मराठी साहित्यातील अनमोल रत्न , निसर्ग कवी ना. धो. महानोर यांच्या निधनाची बातमी आली.

नितीन देसाई यांचे निधन महाराष्ट्रासाठी जितके धक्कादायक ठरले तितकेच महानोर यांचे निधन चटका लावून जाणारे ठरले. मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी महानोर सरांनी जे योगदान दिले ते सुवर्ण अक्षराने नोंदवले जाणार आहे. ना. धो महानोर हे निसर्ग कवी आहे. शेत शिवारात रमणाऱ्या या कवीने आपल्या कवितेतूनही निसर्गाची अमाप उधळण केली. त्यांच्या अदभुत निसर्ग कवितांनी त्यातल्या रंग गंधानी, नदीच्या प्रवाहासारख्या नाद – लईंनी वाचक रसिकांना वेड लावले. रानात राहणाऱ्या महानोर सरांच्या कवितेचं केंद्रस्थान होते ते निसर्ग आणि स्त्रिया. निसर्ग आणि स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी केलेल्या कविता वाचकांच्या मनावर कायमच्या कोरल्या गेल्या. त्यांची एकूण अकरा कविता संग्रह प्रसिद्ध असून अजिंठा नावाचे खंडकाव्यही प्रकाशित झाले आहे.

वही आणि पळसखेडची गाणी हे त्यांचे लोकगीतांचे संग्रह आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांची गाणी देखील लिहिली आहेत. जैत रे जैत चित्रपटातील त्यांची गाणी तर रसिकांच्या ओठावर आजही कायम आहेत. महानोर सर सहा वर्ष विधानपरिषदेचे सदस्य होते या काळात त्यांनी सभागृहात शेती आणि ग्रामीण भागातील प्रश्न पोटतिडकीने मांडले आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केले. महानोर सरांनाही अनेक पुरस्कार मिळाले अगदी पद्मश्री देखील मिळाली मात्र निसर्ग कवी ही रसिकांनी, वाचकांनी त्यांना दिलेली उपाधी ते सर्व पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ मानत. रसिकांच्या आणि वाचकांच्या मनातही ते कायम निसर्ग कवी म्हणूनच स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने मराठी साहित्याची मोठी हानी झाली आहे.

नितीन देसाई आणि ना. धो. महानोर या श्रेष्ठ कलाकारांनी आपल्या कलेतून महाराष्ट्राचे नाव वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. या दोन्ही महान कलाकारांच्या जाण्याने महाराष्ट्राचे आणि कला सृष्टीची मोठी हानी झाली आहे. या दोन्ही महान कलाकारांना भावपूर्ण श्रद्धांजली!

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५