*13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
✍️स्वीटी गेडाम ✍️
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
मो. 7498051230
चंद्रपूर, दि. 4 : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शनिवार दिनांक 13 सप्टेंबर, 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. विधीज्ञ, पक्षकार व नागरीकांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा एस. एस. भिष्म यांनी केले आहे.
मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा एस. एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर व जिल्ह्यामध्ये सदर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे.
झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य आहे. लोक न्यायालयाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने व सर्वसंमतीने त्वरित समक्ष निकाल केला जातो. त्या आदेशाला दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनामाएवढेच महत्व असते व त्याची अंमलबजावणी सुध्दा करता येते. त्याद्वारे वेळ, पैसा, श्रम यांची बचत होते, वादांचा कायमचा समोपचाराने निपटारा होतो. सर्वच पक्षांना जिंकल्याचे समाधान मिळत असल्याने भविष्यकालीन वाद टाळले जातात. या कार्यवाहीसाठी वेगळा शुल्क खर्च लागत नाही.
चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबीत दिवाणी, फौजदारी, कलम १३८ एन. आय.ॲक्ट (धनादेश न वटणे), बँकांची कर्ज वसूली वगैरे प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे, घरमालक भाडेकरू बाद, कौटुंबिक वाद (विवाह-विच्छेदन वगळता), इलेक्ट्रॉसिटी ॲक्टचे चे समझोतायोग्य वाद तसेच न्यायालयात येण्याअगोदरची (प्रि-लिटीगेशन) प्रकरणे, महसुल, पाणीपट्टी,वीजबिल आपसी समझोत्याकरीता ठेवून ती सामंजस्याने सोडविण्याबाबतचे आवाहन एस. एस. भिष्म यांनी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे स्वतः येउन किंवा हेल्पलाईन फोन नंबर ०७१७२-२७१६७९, कार्यालयीन मोबाईल क्र. ८५९१९०३९३४ वर संपर्क करावा, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुधीर इंगळे यांनी केले आहे.