पुलाच्या दुरुस्तीसाठी लष्कराची मदत घ्या
दिलीप जोग यांचे मुख्य सचिव, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-अलिबाग-रोहा मार्गावरील नांगरवाडी व सुडकोली येथील पूल कमकुवत असल्याने बांधकाम खात्याच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात आलेली एस.टी. वाहतूक भारतीय सेना दलाच्या अभियांत्रिकी विभागाची मदत घेऊन, तातडीची उपाययोजना करुन सुरु करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी राज्याचे मुख्य सचिव, जिल्हाधिकारी-रायगड व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील धोकादायक स्थितीत असलेल्या अलिबाग -रोहा मार्गावरील सुडकोली तसेच नांगरवाडी येथील पूल खचल्याने ऐन गौरी गणपती सणांच्या काळात एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने याचा दररोज ये-जा करणाऱ्या जनतेच्या दळणवळणावर विपरीत परिणाम झाला असून, शालेय विद्यार्थी, नोकरदार, कामगारांना समस्येला सामोरे जावे लागत आहे.
जिल्ह्यातील व तालुक्यातील असलेल्या या धोकादायक पुलांकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने ऐन सणासुदीच्या काळात येथील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचे बोलले जात आहे. अद्यापही सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी पुलावरुन वाहतूक सुरु करण्यात अन्य पर्याय शोधण्यात उदासीनता दिसून येत असून, पावसाळ्यानंतर टेंडर्स निघतील, बायपास रस्ते काढले जातील, यात तीन-चार महिन्यांचा कालावधी जाईल.
यासाठी सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास लक्षात घेऊन संबंधित बांधकाम खात्याने भारतीय सेना दलाच्या अभियांत्रिकी विभागाशी तातडीने संपर्क साधून, मदत घेऊन या पुलावरुन लवकरात लवकर एसटी वाहतूक सुरु करण्यात योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी खड्डे दिलीप जोग यांनी निवेदनाद्वारे केली असून, जिल्ह्यातील सर्व लहान-मोठ्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येऊन अहवाल जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात यावा, असे म्हटले आहे.