नागपूर दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

53

नागपूर दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

नागपूर (कुही) : अंघोळीसाठी तलावात उतरलेला धाकटा भाऊ खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागल्याने त्याला वाचविण्यासाठी थोरला पाण्यात गेला. मात्र, पोहता येत नसल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना साळवा ता. कुही परिसरात असलेल्या तलावात शनिवारी दि. ३ दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. दोघेही नागपूर शहरातील रहिवासी आहेत.
सनी शिवशंकर शाहू १९ व वीरेंद्र शिवशंकर शाहू १६ रा. कळमना, नागपूर, अशी मृत भावांची नावे आहेत. दोघेही कबाडी साहित्य विकत घेण्यासाठी गावोगाव फिरत असल्याने ते शनिवारी साळवा येथे आले होते. सकाळी गावात फिरले आणि दुपारच्या सुमारास गावालगतच्या तलावाजवळ गेले. हा तलाव पाण्याने पूर्ण भरला आहे. आपण अंघोळ करू म्हणत वीरेंद्र तलावात उतरला.
क्षणार्धात तो खोल पाण्यात गेल्याने गटांगळ्या खाऊ लागला. तो पाण्यात दिसेनासा झाल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी सनी पाण्यात उतरला. तोही गटांगळ्या खाऊ लागला. हा प्रकार तलावाशेजारी गुरे चारत असलेल्या गुराख्याच्या निदर्शनास आला. त्याने लगेच पोलीस पाटील मेश्राम यांना माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने त्यांचे शोधकार्य सुरू केले. काही वेळाने दोघांनाही शोधून काढण्यात त्याना यश आले. मात्र, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.