चौदहवी का चांद; वहिदा रहेमान
चौदहवी का चांद असे ज्यांचे वर्णन केले जाते त्या हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ दिग्गज अभिनेत्री वहिदा रहेमान यांना २०२१ या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके हा प्रतिष्टेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार आहे. ज्या कलाकाराने आयुष्यभर आपल्या कलेच्या माध्यमातून चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवून हिंदी चित्रपट सृष्टीत अनमोल योगदान दिले अशा महान कलाकाराला हा पुरस्कार दिला जातो.
वहिदा रहेमान यांना हा पुरस्कार तसा उशिराच मिळाला असे म्हणावे लागेल कारण त्यांच्यापेक्षा ज्युनियर कलाकारांना हा पुरस्कार त्यांच्याआधी मिळाला आहे. उशीरा का होईना त्यांना हा पुरस्कार मिळाला याचा आनंद चित्रपट रसिकांना आहे. वहिदा रहेमान या पुरस्कारासाठी सर्वार्थाने पात्र आहेत. जवळपास पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर मोहिनी घातली. १९५० ते १९७० हा काळ हिंदी चित्रपट सृष्टीचा सुवर्णकाळ समजला जातो. या काळात वहिदा रहेमान या आघाडीच्या अभिनेत्री होत्या. हे दोन दशके त्यांनी अक्षरशः गाजवून सोडले. या दोन दशकात त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ३ फेब्रुवारी १९३६ रोजी तामिळनाडूतील चेंगलपेट येथे जन्मलेल्या वहिदा रहेमान यांना डॉक्टर बनण्याची इच्छा होती मात्र नशिबाने त्या बॉलिवूडमध्ये आल्या. वहिदा रहेमान यांना लहानपणापासून नृत्याची आवड होती आपल्या बहिणींसोबत त्यांनी भरत नाट्याचे धडे गिरवले. वहिदा रहेमान यांनी सुरवातीला दाक्षिणात्य चित्रपटात भूमिका केल्या.
एका तेलगू चित्रपटातील त्यांचा अभिनय पाहून गुरुदत्त अक्षरशः भारावले होते. गुरुदत्त यांनीच त्यांना हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी दिली पण त्यांना नाव बदलण्याची अट घातली मात्र वहिदा रहेमान यांनी आपले नाव बदलण्यास स्पष्ट नकार दिला. गुरुदत्त यांनी त्यांना अनेक चित्रपटात संधी दिली. प्यासा, कागज के फुल, चौदहवी का चांद, कागज के फुल, साहेब बीबी और गुलाम यासारख्या लोकप्रिय चित्रपटात गुरुदत्त हेच वहिदा रहेमान यांचे नायक होते. पडद्यावरील त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. गुरुदत्त आणि वहिदा रहेमान ही जोडी हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट ऑन स्क्रीन जोडयांपैकी एक होती.
गुरुदत्त यांच्याप्रमाणेच देव आनंद यांच्याशीही त्यांची जोडी जमली. या जोडीचा १९६५ साली आलेला गाईड हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटातील सुमधूर गाणी आजही लोकप्रिय आहेत.या चित्रपटातील वहिदा रहेमान यांनी साकारलेली रोजी आणि देव आनंद यांनी साकारलेला राजू गाईड आजही रसिकांच्या मनात आहे. देव आनंद यांच्या त्या आवडत्या नायिका होत्या. विशेष म्हणजे ज्या दिवशी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला त्या दिवशी देव आनंद यांची १०० वि जयंती होती हा विलक्षण योगायोग म्हणावा लागेल. १९७४ साली त्यांनी अभिनेता कलमजीत यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांनी काही काळ ब्रेक घेतला. १९९१ साली आलेल्या लम्हे या चित्रपटाद्वारे त्या मोठ्या पडद्यावर परतल्या.
२००० साली पतीच्या निधनामुळे त्यांना मोठा धक्का बसला मात्र त्यातून त्या लवकरच सावरल्या. त्यानंतर त्यांनी दिल्ली 6 आणि रंग दे बसंती या चित्रपटात भूमिका केल्या. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. गाईड आणि निलकलम या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला तर रेशमा और शेरा या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले तर भारत सरकारने त्यांना प्रतिष्टेचा पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या अभिनय कलेचा गौरव केला. आता दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित करून भारत सरकारने त्यांचा पुन्हा एकदा उचित गौरव केला आहे. वहिदा रहेमान यांचे मनापासून अभिनंदन!
श्याम ठाणेदार, दौंड जिल्हा पुणे
मो: ९९२२५४६२९५