चला आतातरी थोडे जगून घेऊया…!

    माणसाचे जीवन जेवढे सुंदर आहे तेवढेच खडतर सुद्धा आहे. क्षणात काय होईल हे सांगता येत नाही म्हणून कशाला उगाचच कोणाला टोचून बोलायचं, कशाला उगाचच कोणाची निंदा, चुगली करायची आणि कशासाठी. ..? कशाला उगाचच दु:ख द्यायचं, कशाला कोणाला फसवायचं…? म्हणतात ना की, प्रत्येक जण एकाच रांगेत उभे असतात त्या रांगेतून कधी कोणाचा नंबर लागेल हे सांगता येत नाही किंवा कोणी सांगू शकत नाही. कोणी कितीही मागे लपण्याचा प्रयत्न करत असेल तरी त्याच्यावर एक ना एक दिवस नंबर येतोच भलाही त्यांच्या जरी वेगवेगळ्या वाटा असतील तरी शेवटी सर्वांना एक दिवस एकाच गावाला जावे लागते मग कशाला उगाचच नको त्या, गोष्टींचा ओझा घेऊन जीवनाची माती करून घ्यायची. ..?

उद्या काय होणार आहे या विषयी जर माहीती असती तर ती गोष्ट वेगळी असती पण, असे कोणालाही माहीत नसते मग त्यातच आपण सर्व समजून घ्यावं. उदा. आपण कितीही समोर जाण्याचा जरी प्रयत्न केला तरी जाऊ शकत नाही कारण समय नेहमी बलवान असतो त्याला कोणीही जिंकू शकत नाही मग आपल्याला ह्या सर्वा बद्दल माहीती असताना हार, जितच्या स्पर्धेत रमून ह्या दोन दिवसाच्या पाहुण्याला का बरं विनाकारण त्रास द्यायचं…?

आजचा दिवस आपला आहे

चला आतातरी जगून घेऊ

कोणी, कोणाचे नसती जगात

सत्याला सोबतीला घेऊ

दररोज निघणाऱ्या लखलखत्या त्या सूर्याकडे आपण बघत असतो पण,एकटक त्याच्याकडे बघू शकत नाही कारण तो सत्य आहे जेव्हा पासून तो निघत असतो तेव्हा पासून मावळे पर्यत त्याला किती त्रास सहन करावा लागतो. कधी काळेकुट्ट मोठे ढग आडवे येतात, कधी मधातच वीज चमकते तरीही तो, सर्वांचा हसत, हसत सामना करून प्रकाश देत असते कारण तो स्वयंप्रकाशित असतो मग आपण सुद्धा त्या लखलखत्या सूर्याकडे बघून जगण्याचा खरा आनंद घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नेहमीच सत्याचा स्वीकार करून त्याच वाटेवर चालण्याचा विचार केले पाहिजे. जीवनाला आधार मिळेल. माणसाचं जीवन म्हटलं तर त्यात सुख, दु:ख,अडीअडचणी, संघर्ष, चांगले वाईट प्रसंग,आपत्ती, प्रेम, मानसन्मान, आदर, आपुलकी, माणुसकी असते तेवढेच तिरस्कार कपटकारस्थान , हिंसा हे तर असतातच म्हणून जे चांगले गुण, व योग्य संपत्ती आहे तिला टिकवून ठेवण्यासाठी माणुसकीच्या नात्याने प्रयत्न केले पाहिजे आणि जे, आपल्या जीवनाला घातक आहेत त्याचा त्याग केले पाहिजे शेवटी त्यागामधूनी पुण्य मिळते आपण ऐकून आहोत म्हणून या दोन दिवसाच्या पाहुण्याला त्याच प्रकारचे जगणं ठेवण्यासाठी नको त्या गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी माणूस बनून जगल्याने जीवनाचे खरे महत्व कळेल. 

जीवन हे सुंदर आहे

त्याला सुंदर बणवूया

आपण आहोत माणूस प्राणी

सदैव आठवणीत ठेवूया

कोणी म्हणतात की, माणसाचा जन्म अनेक जन्मानंतर मिळतो म्हणजेच या मानवी जीवनात काहीतरी वेगळं असेल म्हणूनच माणूस प्राण्याला श्रेष्ठ मानल्या गेले आहे कारण त्याला बोलता येते,जगातील सर्वच गोष्टींविषयी माहीती असते म्हणून त्याला बुद्धीवान असे एक नाव दिले गेले आहे. या, पृथ्वीतलावर जो माणूस जन्म घेतो त्याला एक ना एक दिवस हे जग सोडून जावेच लागते हा निसर्गाचा नियमच आहे म्हणून आतातरी या मानवी जीवनाचे खरे महत्व जाणून जगूया व इतरांनाही त्याचे महत्व पटवून देऊया

सौ.संगीता संतोष ठलाल 

मु.कुरखेडा जि.गडचिरोली 

७८२१८१६४८५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here