वाई बाजार दुर्घटनेेेतील दुस-या मजुराचा ही मृत्यू…
कंत्राटदाराचा हलगर्जीपणा मजुरांच्या जीवावर बेतला…
सिंदखेड पोलिसांची संशयास्पद भूमिका; घटनेच्या निषेधार्थ गाव बंद
गोपाल नाईक नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नांदेड : माहूर तालुक्यातील वाई बाजार नाली बांधकाम दुर्घटनेतील काल मृत्यूमुखी पडलेल्या एका मजुरानंतर यवतमाळ येथे उपचार घेत असलेल्या दोन मजुरा पैकी प्रकृती अत्यंत चिंताजनक असलेल्या दुसऱ्या मजुराचाही आज पहाटे उपचारादरम्यान शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे मृत्यू झाला असून ता.३ आॅक्टो रोजी सकाळी घडलेल्या घटनेत सिंदखेड पोलिसांना संबंधित ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद दिल्यानंतर सुद्धा गुन्हा दाखल न केल्यामुळे मृत्यू झालेल्या मजुराची कुटुंबीय व परिसरातील आदिवासी समाज आक्रमक होऊन पोलिसांचा निषेध करण्यासाठी ४आॅक्टो. रोजी वाई बाजार बंदची हाक देण्यात आली असून कडकडीत बंद पाडण्यात आले.
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामाअंतर्गत नाली बांधकामावरील सेंट्रिंग काढत असताना काल ता.३ आॅक्टो.रोजी वाई बाजार येथे सकाळी ११:३० च्या सुमारास निकृष्ट दर्जात बांधकाम करण्यात आलेली नालीची भिंत आणि त्यावरील स्लॅब कोसळले होते,त्यात संजय किशन मडावी (वय ३९) वर्षे, शुभम भिमराव पेंदोर वय २५,व सुमित सिताराम मरापे (वय २०) तिघेही राहणार कोलामखेडा वाई बाजार तालुका माहूर हे तिघेही त्या भिंतीखाली दाबल्या गेले होते. यात संजय किशन मडावी याचा जागेवरच मृत्यू झाला तर इतर दोन मजुरांची प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.अत्यावस्थ अवस्थेत उपचार घेत असलेला शुभम भिमराव पेंदोर याचाही आज पहाटे ६:३०च्या सुमारास मृत्यू झाला असून दोन मृत्यूंमुळे संपुर्ण वाई बाजारवर शोककळा पसरली आहे.वाई बाजार येथील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाच होत असल्याची ओरड नागरिकांनी केल्यानंतर माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झालेत परंतु या बातम्यांची थोडीफार ही दखल पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यासह अभियंत्यांनी घेतली नाही.निकृष्ट कामाच्या तक्रारीची दखल वेळीच घेण्यात आली असती तर आज ही दुर्घटना घडली नसती आणि दोन गरीब आदिवासी मजुराचा मृत्यू झाला नसता.मजुराच्या मृत्यूला संबंधित कंत्राटदार एजन्सी,पंचायत समितीचे अधिकारी हे मजुराच्या मृत्यूला कारणीभूत असल्याने त्यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतक आदिवासी मजुरांच्या कुटुंबाकडून केली जात आहे.
◼️सिंदखेड पोलिसांची संशयास्पद भूमिका; घटनेच्या निषेधार्थ गाव बंद!
नाली दुर्घटना घडल्यानंतर संजय मिळावी या मृत मजुराच्या पत्नीने सिंदखेड पोलीस ठाण्यात संबंधित कामाच्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी रीतसर फिर्याद दिली,परंतु सिंदखेड पोलिसांनी या प्रकरणाला थोडेही गंभीरपणे घेतले नसून कामाच्या ठिकाणी उभी असलेली जेसीबी मशीनमुळे अपघात झाल्याचा बनव करत जेसीबी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करू अशी भूमिका पोलिसांनी घेतली होती,दरम्यान शुभम पेंदोर या मजुराचा मृत्यू झाला असून पोलीस या दोन्ही घटनेकडे कमालीचा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मृत्यू झालेल्या मजूर कुटुंबाकडून केला जातोय,त्यासाठी ता.४ आॅक्टो.ला पोलिसांच्या निषेधार्थ वाई बाजार बंदची हाक देण्यात आली असून दुपारी दोन वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाडण्यात आले आहे.
