कर्जबाजारी झाल्याने मुलींची हत्या करून पित्याची आत्महत्या.

67

कर्जबाजारी झाल्याने मुलींची हत्या करून पित्याची आत्महत्या.

एकाच कुटुंबातील तिघांचे आढळले मृतदेह, २ लेकींची हत्या करून पित्याने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज.

कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरातील खान गल्लीत आज एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळून आले. ४५ वर्षीय अजगर अली जब्बार अली नावाच्या वडिलांनी दोन मुलीची हत्या करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली आहे.

मुंबई;- कर्ज बाजारी झाल्याने दोन मुलींची हत्या करून पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज कांदिवली परिसरात घडली. अजगर अली जब्बार अली शेख असे मृताचे नाव आहे. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली.

अजगर अली हा मालवणीच्या म्हाडा कॉलनीमध्ये पत्नी आणि चार मुलींसोबत राहत होता. त्याचा कांदिवलीच्या लालजी पाडा येथे खान गल्लीत पेंटोग्राफीचे युनिट आहे. आज दुपारी अजगर अली हा एक अकरा वर्ष आणि एक पाच वर्षाच्या अशा दोन मुलींना घेऊन कारखान्यात आला. काही वेळ कारखान्यात तो थांबला. दुपारी त्याने पत्नीला फोन केला. त्यानंतर अजगर अलीने फोन बंद केला.

अजगर अलीचा फोन बंद येत असून तो अद्याप घरी न आल्याने त्याच्या पत्नीने एका नातेवाईकाला फोन केला. त्यानंतर नातेवाईकाने जाऊन पाहिले असता अजगरअलीने लोखंडी रॉडला गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळले.

घटनास्थळी पोलिसांना त्याच्या दोन मुली बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी त्या तिघांनाही तातडीने उपचारासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्या तिघांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.