आईचा घटस्फोट देण्यास नकार; अल्पवयीन मुलाने केली आईची हत्या.

 नवी दिल्ली:- राजधानी मध्ये अल्पवयीन मुलाने जन्मदात्या आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या वडिलांनी त्याच्या आईकडे घटस्फोटाची मागणी केली होती. मात्र, आईने घटस्फोट देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याचे मित्र त्याची टर उडवत त्याला टोमणे मारत होते. मित्रांच्या टोमण्याने त्रस्त झालेल्या अल्पवयीन मुलाने जन्मदात्या आईचीच हत्या केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.

अल्पवयीन मुलाला अटक करून ज्युवेनाइल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे. मृत महिला मुली आणि मुलासह दिल्लीत राहत होती. सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी ती पतीपासून विभक्त झाली होती. न्यायालयात त्यांच्या घटस्फोटाचा खटला सुरू होता. पती घटस्फोटाची मागणी करत होता. मात्र, तिने घटस्फोट देण्यास नकार दिला होता.

मृत महिलेचा मोठा मुलगा वडिलांसोबत राहत होता. या घटस्फोटासाठी आईच कारणीभूत आहे, असे त्याला वाटत होते. त्याने अनेकदा आईला वडिलांना घटस्फोट देण्याबाबत सांगितले होते. तसेच त्याने आईला ठार मारण्याची धमकाही दिली होती, असे महिलेच्या मुलीने सांगितले. मात्र, आईने घटस्फोट देण्यास ठाम नकार दिला होता.

मुलगा 30 नोव्हेंबरला आईकडे जेवण करण्यासाठी आला होता. जेवण झाल्यावर रात्र असल्याने त्याने आईला आपल्याला वडिलांच्या घरापर्यंत सोडायला ये, असे सांगितले. महिला आणि मुलगा घरातून रात्री 12.40 वाजता घरातून निघाले. त्यानंतर महिला घरी परतलीच नाही. तिचा मतदेह 1 डिसेंबरला आढळला होता. महिलेचा मृतदेह आढळल्यावर तिच्या मुलीने मोठ्या भावाला अनेकदा फोन केला. मात्र, त्याचा मोबाईल स्वीच ऑफ होता.

पोलिसांनी तपास सुरू केल्यावर मोठ्या मुलाचे मित्र त्याला त्याच्या आईवडिलांच्या संबंधांबाबत आणि आई घटस्फोटासाठी नकार देत असल्याच्या मुद्द्यावरून टोमणे मारत होते. त्यामुळे तो त्रस्त होता, असे समजले. तसेच या सर्वांना आईच कारणीभूत असल्याचा त्याचा समज होता. त्यामुळे रागाच्या भरात त्याने जन्मदात्या आईचीच हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक केली आणि अल्पवयीन असल्याने त्याला ज्युवेनाइल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश दिले असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here