चंद्रपुरात लवकरच सुरू होणार तांब्याच्या खाणी! वेदांता कंपनी खाण सुरू करण्याच्या तयारीत. स्थानिक लोकांना रोजगार प्राप्त होण्याची चिन्हे
अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
मो: 883085735
चंद्रपूर,3 डिसेंबर: चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्याच्या दुपारपेठ आणि ठाणेवासना येथे 7.2 मिलियन टन इतके मोठे तांब्याचे साठे मिळाले असून, त्या ठिकाणी वेदांता कंपनी दोन खाणी सुरू करण्याच्या तयारीत आहे. 1 फेब्रुवारी 2019 मध्ये राज्य शासनाने वेदांताला आमंत्रित केले होते. ठाणेवासना येथे 768.72 हेक्टर जागेवर, तर दुपारपेठ येथे 816.29 हेक्टर जागेवर या खाणी प्रस्तावित असून, दोन्ही खाणी मिळून 7.2 मिलियन टन तांब्याचे साठे काढले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात सोन्याचा साठा आढळून आला असून, तिकडे खाणी होणार असल्याचे खनिकर्म विभागाच्या अहवालात उल्लेख असून, तसे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात केल्याने दुर्मिळ धातूंच्या खाणीचा विषय प्रकाशझोतात आला. त्याआधीच या जिल्ह्यात तांब्याचा साठा असल्याची बाब स्पष्ट झाली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात चालको पायराईट, पायराईट, मॅग्नेटाइत, स्फिन, रुटाईल, डायमेनाईट, बोराईट, गोथाइट, क्रोमाइट, कोवेलाइट आणि ग्राफाईटसारखे मौल्यवान खनिजेसुद्धा आढळली. परंतु, यापैकी तांबे मात्र मोठ्या प्रमाणात आढळले. भारतीय भुविज्ञान सर्वेक्षण विभागाने 1971-1979 वर्षाच्या काळात येथे सर्वेक्षण केले होते.
2004 साली यावर शासनाने सविस्तर अहवाल प्रकाशित करून खाण सुरू करण्यासाठीच्या हालचालीही सुरू केल्या होत्या. 2019 मध्ये प्रक्रिया सुरू करून वेदांता कंपनीला आमंत्रित केले होते, अशी माहिती भूगर्भ शास्त्राचे अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.