गेल्या दशकातील सर्वात मोठा भूकंप तेलंगणात
📍विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडार्यातही सौम्य धक्के
🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
चंद्रपूर : 4 डिसेंबर
तेलंगणा राज्यात बुधवार, 4 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजून 28 मिनिटादरम्यान मुलुगा जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठावर इटूरणागरम वन्य जीव अभयारण्य क्षेत्रात 5.3 ‘रिष्टर स्केल’चा भूकंप झाला. गोदावरी नदीच्यालगत 10 किमीच्या आत या भूकंपाचे केंद्र होते. भूकंपाचे सौम्य धक्के महाराष्टातील चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि नागपूरपर्यंत जाणवले. भूकंपाचे केंद्र चंद्रपूरपासून सरळ 217 किमी अंतरावर आहे. गेल्या दशकातील हा सर्वात मोठा भूकंप होता.
तेलंगणा राज्यात ‘गोदावरी रिफट व्हेली’ आणि पूर्व तेलंगणातून ‘कदंब फाल्ट’ जात असून, हे भूकंप प्रवण क्षेत्र 3 मध्ये येते. या भागात ‘हायड्रो सिस्मिसीटी’ प्रकारामुळे भूकंप होतात. भूशास्त्राच्या भाषेत अशा भूकंपाना गोदावरी फाल्ट भूकंप म्हणतात. असे 3 ते 4 ‘रिष्टर स्केल’चे भूकंप अधून मधून येत असतात. परंतु, बुधवारी आलेला भूकंप हा दशकातील मोठा होता.
जिल्ह्यातील नागभीड, सिंदेवाही, चंद्रपूर, राजुरा, मूल आदी तालुक्यांत या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून, नागभीड तालुक्यातील तळोधी येथील अनुसया नगरातील सोनू नुरानी यांच्या घरातील वस्तू हलल्याचे त्यांनी सांगितले. तर अनेक ठिकाणी घरातील भांडी खाली पडली. अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.