यवतमाळ एक लाखाची लाच स्वीकारणारा पोलिसउपनिरीक्षक जाळ्यात; ‘एसीबी’ची कारवाई.

74

यवतमाळ एक लाखाची लाच स्वीकारणारा पोलिसउपनिरीक्षक जाळ्यात; ‘एसीबी’ची कारवाई.

यवतमाळ:- फटाक्याच्या व्यवसायावर पोलिस अधीक्षकांच्या पथकाची रेड थांबविण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारणारा पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई सोमवारी घाटंजीच्या पोलिस ठाण्यातील भरोसा सेल येथे केली. राजाभाऊ त्र्यंबकराव घोगरे, असे लाचखोर पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. एसीबीच्या या कारवाईने पोलिस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

घाटंजी येथील 48 वर्षीय तक्रारदार असलेल्या व्यक्तीचा फटाके विक्रीचा व्यवसाय आहे. पीएसआय घोगरे याने पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची रेड थांबविण्यासाठी तक्रारदाराला सहा लाख रुपयांची मागणी केली. तशी तक्रार एसीबीकडे देण्यात आली. 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पडताळणी करण्यात आली. अखेर एक लाख रुपयांवर तडजोड झाली.

सोमवारी एक लाखांची लाच स्वीकारताना घोगरे याला पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले. वृत्तलिहेस्तोवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलिस अधीक्षक गजानन पडघण, पोलिस उपअधीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक हर्षराज अळसपुरे, गजेंद्र क्षीरसागर, सचिन भोयर, गेडाम, वसीम शेख यांनी केली.