सिद्धांत
५ जानेवारी २०२०: काल रात्री आठच्या सुमारास पुण्यातून पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी जाहीर झाली. सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेली. राजकीय, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांनी सोशल मीडिया, प्रसारमाध्यमांद्वारे माईंना श्रद्धांजली वाहिली. सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सपकाळ   यांनीही प्रसारमाध्यमांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी तमाम जनतेला एक भावनिक आवाहन केलं. माई निघून गेल्या असं म्हणू नका. ते एक वादळ होत. शांत झालं. आईसारख्या व्यक्ती ह्या जगातून कधीच निघून जात नाही. त्या असतात. त्या आहेत.

खरंच सिंधुताई सपकाळ अजूनही आहेत. त्यांनी दत्तक घेतलेल्या हजारो अनाथ मुलांच्या स्वप्नात, त्याच्या जगण्यात सिंधुताई सपकाळ आहेत. त्यांनी चालविलेल्या अनाथाश्रमातील लहानग्यांच्या हसण्या-खेळण्यामागे माई असणार आहेत. वर्धा जिह्यातील एक लहानश्या गावातील एक अन्यायग्रस्त महिला ते पद्मश्री पर्यंतचा माईंचा खडतर संघर्षाचा प्रवास अंगावर थरकाप उडवणारा आहे. पण असा दुर्दैवी संघर्ष दुसऱ्यांच्या वाटेला येऊ नये म्हणून माईंनी अनेक संस्थांच्या माध्यमातून अनाथ आणि गरजू व्यक्तींना मदतीचा हात दिला होता. ह्या संस्थांची कार्य तितक्याच जोमाने चालू राहतील असा माईंच्या अनुसरकानी केलेल्या निश्चयामागे सिंधुताई सपकाळांची मायाळू प्रेरणा अशीच वर्षोनुवर्षे राहणार आहे.

ममता बाल सदन पुणे या संस्थेची स्थापना माईंनी १९९४ साली केली. ह्याठिकाणी शेकडो अनाथ मुलांना माईंनी निवारा, शिक्षण आणि त्यांच्या जगण्याला नवीन दिशा मिळवून दिली. ह्या संस्थेबरोबरच माईंनी ” मदर ग्लोबल फौंडेशन” या जागतिक पातळीवरील संस्थेची स्थापना केली. या संस्थांबाबत बोलताना माई म्हणायच्या ” माझ्या महाराष्ट्राच्या कार्यक्षेत्रापुरत्या संस्था सुरू आहेत. परंतु परदेशात गेल्यानंतर तेथील देणगीदारांना मदत करायला अनेक अडचणी येत होत्या. त्या वेळी जागतिक पातळीवर संस्था स्थापन करण्याचा विचार माझ्या मुलांनी सुरू केला. त्यामुळे त्यांच्या पंखात बळ देण्यासाठी ‘मदर ग्लोबल फाउंडेशन’ नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेला रशियातील देणगीदारांनी मदत केली. या संस्थेच्या माध्यमातून आता महाराष्ट्रात अनाथ मुलांसाठी शाळा कॉलेज काढण्याचा मानस आहे’.

sanmati bal niketan
सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या संस्था.

सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन आणि शिक्षण संस्था (पुणे ), वनवासी गोपालकृष्ण शिक्षण क्रीडा प्रसारक मंडळ (अमरावती), सन्मती बाल निकेतन मांजरी (पुणे), चिखलदरा सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, अभिमान बाल भवन (वर्धा) यासारख्या संस्था,अनाथ आश्रम आणि वसतिगृहांची माईंनी स्थापना केली. वर्ध्यामध्ये गोपिका गाय रक्षण केंद्र नावाच्या गोशाळेची स्थापना देखील माईंनी केली होती.

सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या संस्था.

भाषणामध्ये, प्रसारमाध्यमांशी बोलताना माई अभिमानाने म्हणायच्या “मी हजार मुलांची आई आहे”. माईंनी आपल्या ७४ वर्षांच्या आयुष्यात १५०० हुन अधिक अनाथ मुलांना दत्तक घेतले. त्यांना लहानाचे मोठे केले, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवले, त्यांचे संसार थाटून दिले. आजही दर दिवसाला माईंनी स्थापन केलेल्या संस्थांमध्ये अनाथ, उपेक्षित समाजातील मुले मदतीच्या आशेने येत असतात. ह्या संस्थांच्या मार्फत अश्या मुलांचे भविष्य घडविण्याचे काम माईंच्या नंतर तितक्याच जोमाने होणे गरजेचे आहे. तसेच या कामात प्रशासन आणि नागरिकांनी सढळ हातानी सहकार्य केल्यास, माईंसाठी तीच खरी श्रद्धांजली ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here