राळेगाव तालुक्यातील ईचोरा येथील तलाठीचा मनमानी कारभार, पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय लाभा पासून वंचित ठेवण्याचे केले कारस्थान
मनोज एल खोब्रागडे
सह संपादक मीडिया वार्ता न्युज
मो: 9860020016
राळेगाव: – सविस्तर वृत्त असे की राळेगाव तालुक्यात दिनांक 18/7/2022 रोजी झालेल्या भीषण पुरामुळे नदिकाठील शेतकऱ्यांचे संपूर्ण शेत खरडून गेले, त्याच प्रमाणे या पुराचा फटका तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर असलेल्या ईचोरा येथील शेतकऱ्यांना सुध्दा बसला, या परिसरात तीनदा झालेल्या पुराने शेतकरी उध्वस्त झालेला असून कर्जाच्या ओझ्याने पूर्णपणे कोलमडून गेलेला आहे,
नदीकाठच्या शेतकऱ्यांची 100% नुकसान झालेली असताना व मा.तहसीलदार साहेब, व मा.उपविभागीय अधिकारी यांनी तलाठी ईचोरा यांना खरडून गलेल्या शेतीचा पंचनामा करण्याचे आदेश दिला असताना सुध्दा अजूनपर्यंत खरडून गेलेल्या शेतींचा पंचनामा केल्याचे निदर्शनास शेतकऱ्यांना आले नसून,अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे काम तलाठी करीत आहे.
तसेच काही शेतकऱ्यांनी पंचनामा करून खरडून गेलेल्या शेतीसाठी शासनाच्या शासन निर्णयानुसार आर्थिक लाभ मिळावा म्हणून अर्ज करूनही सबंधित तलाठी हा दुर्लक्ष करीत असून कधी ग्रामसेवक चे तर कृषी सहायक कडे जाण्याचे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचे निदर्शनास येत आहे,
तरी मनमानी करणाऱ्या व शेतकरीविरोधी असणाऱ्या तलाठी वर तालुका प्रशासन कारवाई करेल की नाही व शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही असा प्रश्न पूरग्रस्त ईचोरा येथील शेतकरी करीत आहे.