आमदार अडबाले यांच्या पहिल्याच भाषणाचे सभापतींकडून कौतुक! राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर जाहीर केली चिंता

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर,३ मार्च: नागपूर शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना, राज्यातील शिक्षण व्यवस्थेची गंभीर स्थिती मांडली. नुकतेच आणि पहिल्यांदाच निवडून आलेल्या अडबाले यांना या भाषणाबद्दल सभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी शाबासकी देत, मुद्देसूद मांडणी केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

अडबाले यांनी आपल्या भाषणात, शिक्षकांची रिक्त पदे, उच्च तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापकांची स्थिती, विद्यापीठांचे केले जाणारे स्वायत्तीकरण, जुनी पेन्शन, मराठी शाळांची स्थिती, अनुदानित शाळांचा प्रश्न, आरटीईअंतर्गत प्रवेश आणि प्रदूषण अशा सर्व विषयांना हात घातला. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये तब्बल ५७ हजार ७५५ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. उच्च तंत्र शिक्षण

विभागात २०१२ पासून पद भरती बंद आहे. एकच मुख्याध्यापक मान्यताप्राप्त आहे, तर अन्य शिक्षक हे घड्याळी तासिकेवर काम करीत आहेत. त्यांना अल्प मानधन दिले जाते. प्राध्यापकांचीही स्थिती अशीच आहे. येथे पाच वर्षांसाठी प्राचार्यांची नियुक्ती केली जाते, तर अन्य प्राध्यापक हे अस्थायी आहेत. राज्य शासनाकडून विद्यापीठांचे स्वायत्तीकरण केले जात आहे. यामुळे शैक्षणिक शुल्क ठरविण्याचे सर्व अधिकार हे संस्थाचालकांना जाणार आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेताना मोठी अडचण निर्माण होणार आहे. जुन्या पेन्शनचा विषय गंभीर आहे. त्यामुळे नागपूर अधिवेशनात सुमारे दीड लाखांवर कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी मृत कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युईटी आणि पेन्शन देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

यापुढे खाजगी शाळांत आरक्षण लागू होणार नसल्याने हक्काच्या रोजगाराच्या संधी हिरावून घेतली जाणार असल्याची भीती व्यक्त केली. आरटीई अंतर्गत २५ टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांत प्रवेश दिला जातो. परंतु, २०१९-२० पर्यंत राज्यातील शाळांना ३९१४ कोटी रुपये देणे बाकी असल्याचेही अडबाले यांनी सांगितले. सोबतच विदर्भातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करावी, शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी पांदण रस्ते तयार करावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here