खलिस्तानवाद्यांचा वेळीच बंदोबस्त करा
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो: ९९२२५४५२९५
चार दशकांपूर्वी ज्या खलिस्तानवाद्यांनी भारताच्या एकात्मता आणि सार्वभौमत्वाला आव्हान दिले होते, ज्यांनी भारताच्या एका महान पंतप्रधानांची आणि पंजाबच्या काही मुख्यमंत्र्यांची हत्या केली ते खलिस्तानचे भूत पुन्हा एकदा भारताच्या मानगुटीवर बसण्याच्या प्रयत्न करत आहे. चार दशकांपूर्वी जर्नलसिंग भिंद्रणवाले यांनी स्वतंत्र खलिस्तानसाठी भारताच्या एकात्मता आणि सार्वभौमत्वाला आव्हान दिले होते आता तेच काम वारीस दे पंजाब ही संघटना करत आहे.
वारीस दे पंजाब ही संघटना खलिस्थान समर्थक असून या संघटनेला परदेशातून पाठबळ मिळत आहे अर्थात खलिस्तानवाद्यांना परदेशातून पाठबळ मिळणे ही नवी बाब नाही. चार दशकांपूर्वी जेंव्हा खलिस्तान चळवळीने मोठ्या प्रमाणात जोर धरला होता तेंव्हाही त्या संघटनेला पाकिस्तानातून पाठबळ मिळत होते. इतकेच नाही तर कॅनडा आणि ब्रिटनमध्येही खलिस्तान समर्थकांची मोठी संख्या होती. कॅनडाच्या सरकारमधील अनेक मंत्री खलिस्तान समर्थक होते त्यांनी त्या काळात भिंद्रणवाले याला आर्थिक मदत केल्याचे पुरावे भारत सरकारने उघड केले होते.
आताही अमृतपाल सिंग याच्या संघटनेस विदेशातून पाठबळ मिळत आहे हे उघड आहे अजूनही सरकारने यावर ठोस भूमिका घेतली नाही कदाचित हा प्रश्न संवेदनशील असल्याने सरकार प्रत्येक पावले विचारपूर्वक टाकत असेल मात्र हे करताना खलिस्तानचे हे भूत पुन्हा भारताच्या मानगुटीवर बसू नये याचीही काळजी सरकारने घ्यायला हवी कारण हे भूत जर पुन्हा भारताच्या मानगुटीवर बसले तर ते भारताच्या एकात्मता आणि सार्वभौमत्वालाच आव्हान देऊ शकते.