पाणी व स्वच्छतेसाठी कार्य करणाऱ्या महिलांचा करण्यात येणार सन्मान
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे पाणी, स्वच्छता, आरोग्य संबंधित उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना प्रेरणा देण्यासाठी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्ताने सन्मान करण्यात येणार आहे तसेच या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिली.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्यावतीने जिल्ह्यात जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत स्तरावर महिलांची विशेष धाव (वॉश रन) आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये महिला, किशोरवयीन मुली, विद्यार्थीनी ,स्वच्छता कर्मचारी, पाणी व स्वच्छता समितीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य सहभागी होणार असून, पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित संदेशाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच ८ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष महिला सभेचे आयोजन केले आहे. सदर दिवशी ग्रामपंचायतीमध्ये पाणी, स्वच्छता व आरोग्य संबंधित कार्यक्रमाच्या अंमलबजावणी दरम्यान सद्यस्थितीत येणाऱ्या अडी अडचणी बाबत चर्चा विनिमय करण्यात येणार आहे.
सर्व तालुकास्तरावर सत्कार सोहळा आयोजित करण्यात येणार असून, पाणी, स्वच्छता व आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येईल. तसेच पाणी व स्वच्छतेचे व्यवस्थापन करणारे स्वयंसेवी गट, नेते, किशोरवयीन चॅम्पियन, पाणी गुणवत्ता बाबत देखभाल दुरुस्त करणाऱ्या महिला आणि पाणी, स्वच्छता व आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व व्यक्तींचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी दिली आहे.
…………………..