साक्षी राऊत संतगाडगेबाबा राज्यस्तरीय आदर्श महिला उद्योजिका पुरस्काराने सन्मानित
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त पहाट फाऊंडेशनतर्फे अलिबाग तालुक्यातील मापगावच्या सामाजिक कार्यकर्त्या साक्षी दिनेश राऊत यांना बुलढाणा येथे संत गाडगेबाबा राज्यस्तरीय ‘आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार २०२५’ ने आमदार संजय कुटे यांच्याहस्ते सन्मानीत करण्यात आले.
साक्षी दिनेश राऊत यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आशा सेविका म्हणून केली. यामध्ये आरोग्याविषयी काम करीत असताना गावातील महिलांसोबत त्यांचा जास्त संपर्क येत होता. हे काम करताना काही महिलांचा स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, पोटातील व शरीरातील इतर कर्करोग आजाराने ग्रस्त असल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी या महिलांना मुंबई येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जात त्यांच्यावर यशस्वी उपचार केले. महिलांना बहुतेक होणारे कर्करोगाचे आजार हे मासिक पाळीच्या वेळी चुकीचे व आरोग्याला घातक असणारे सॅनिटरी पॅड वापरल्यामुळे झाल्याचे दिसून आले. त्यामुळे काही काळानंतर साक्षी राऊत यांनी आशा सेविकेचा काम सोडून महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती सुरु केले.
सुरुवातीला त्यांनी आपल्या परिसरातील प्रत्येक गावात जाऊन माताभगिनींमध्ये सॅनिटरी पॅडबाबत जनजागृती करीत योग्य पॅड वापरण्याचे आवाहन केले. यासाठी त्यांनी आरोग्यासाठी असणारे योग्य दर्जाचे व अल्पदरात कॉटनचे विघटन होणारे ‘सॉफ्ट डेस’ हे सॅनिटरी पॅड विकत इतर महिलांना देखील विकण्यासाठी गावागावात जाऊन प्रोत्साहन दिले. आपले कार्य आपल्या परिसरात मर्यादित न ठेवता अलिबाग तालुक्यासह रायगड जिल्हा व नंतर मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, फलटण, चिपळूण यासह इतर जिल्ह्यात जाऊन जनजागृती करीत तेथील महिलांना अल्पदरात कॉटन आणि विघटन होणारे ‘सॉफ्ट डेस’ कंपनीचे सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देत, त्या परिसरातील अनेक गरीब गरजू महिलांना सॅनिटरी पॅड विकण्याचा व्यवसाय सुरू करण्याबाबत प्रोत्साहन दिले. आज त्या महिला व्यवसायाच्या माध्यमातून हे सॅनिटरी पॅड विकून रोजगार मिळवत आपल्या कुटुंबाच्या घरखर्चाला हातभार लावत आहेत. या महिलांना मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड वापरण्याचे जनजागृतीच्या केल्यामुळे आजतागायत हजारो माताभगिनींना कर्करोगाच्या आजारापासून वाचविण्याचे त्यांनी कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत अनेक सामाजिक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. नुकतेच संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा येथील शेगाव येथील पहाट फाऊंडेशनतर्फे संत गाडगेबाबा राज्यस्तरीय ‘आदर्श महिला उद्योजिका पुरस्कार २०२५’ हा पुरस्कार आमदार डॉ. संजय कुटे यांच्याहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने, संग्रामचे तहसीलदार प्रशांत पाटील, मिसेस इंडिया विजेत्या श्वेता परदेशी, प्रसिध्द साहित्यीक तथा व्याख्याते प्रा.डॉ. संजय गायकवाड, दादासाहेब धनाजी नाना चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्रसिंह दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.