स्पॉटलाईट: चीनची पुन्हा आगळीक

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

जगातील सर्वात विश्वासघातकी देश जर कोणता असेल तर तो चीन. भारताने याचा अनुभव वेळोवेळी घेतला आहे. १९६२ साली चीनने भारताशी मौत्रीचा पंचशील करार केला मात्र या कराराची शाई वाळते ना वाळते तोवरच हिंदी चिनी भाई भाई म्हणत चीनने भारताचा विश्वासघात करत भारतावरच आक्रमण केले आणि भारताचा काही भाग गिळंकृत केला. मैत्रीचा हात पुढे करून बेसावध असलेल्या भारताचा त्यांनी विश्वासघात केला आणि अरूणाचल प्रदेशचा बराचसा भाग घशात घातला. त्यानंतर त्यांनी अनेकदा भारताशी मैत्रीचे नाटक करून भारतीय हद्दीत बेकायदेशीररित्या घुसखोरी केली.

या घुसखोरीचे एकमेव कारण म्हणजे त्यांना भारताचा अविभाज्य भाग असलेला अरुणाचल प्रदेश चीनमध्ये सामील करून घ्यायचा आहे त्यासाठी ते कधी थेटपणे तर कधी छुपेपणाने भारतीय हद्दीत प्रवेश करतात. दोन वर्षांपूर्वी चीनने भारताच्या हद्दीत प्रवेश करून अतिक्रमण केले होते तेंव्हा भारतीय सैन्याने त्यांना पिटाळून लावले त्यात काही चीनचे काही सैनिक मारले गेले त्यानंतर त्यांनी भारताशी चर्चेचे नाटक केले. यादरम्यान भारत आणि चीन दरम्यान अनेक उच्चस्तरीय बैठका झाल्या या बैठकीत दोन्ही बाजूने शांततेसाठी प्रयत्न सुरू असतानाच चीनने पुन्हा आपला खरा रंग दाखवला.

यावेळी चीनने भारताची आगळीक करताना नुकताच एक नकाशा प्रसिद्ध केला या नकाशात चीनने अरुणाचल प्रदेशमधील अकरा गावांना चीनच्या हद्दीत दाखवले असून या अकरा गावांना चीनने चिनी भाषेत नावे दिली आहेत. ही अकरा गावे भारतीय हद्दीत असताना त्यांना चीनच्या नकाशात दाखवण्याचा चीनचा हा प्रयत्न म्हणजे भारताची खोडी काढण्याचाच प्रकार आहे. अर्थात चीनची अशी आगळीक काय पहिल्यांदाच केली आहे असे नाही वारंवार चीन अशी आगळीक करून भारताची खोडी काढतो यामागे चीनची निश्चितच काहीतरी रणनीती असेल.

भारताने चीनच्या या आगळकीकडे दुर्लक्ष करता कामा नये. कारण एखादी छोटी चूक देखील मोठ्या संकटाला आमंत्रण देणारी ठरू शकते. भारताच्या लष्करप्रमुखांनी देखील काही दिवसांपूर्वी म्हटले होते की चीन सीमेवरील परिस्थिती खूपच स्फोटक आहे. चीन कधी काय करेल याचा नेम नाही म्हणूनच भारताने चीनची ही कृती हलक्यात घेऊ नये. चीनने भारताचा भाग चीनच्या नकाशात दाखवून त्यांना चिनी भाषेतील नावे का दिलीत याबाबत भारताने चीनला खडसवायला हवे.

भारताने हा मुदा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करून चीनची पोलखोल करायला हवी. चीनच्या प्रत्येक गोष्टीवर भारताचे लक्ष असून चीनच्या प्रत्येक कृतीला भारत उत्तर देऊ शकतो असा इशाराच भारताने चीनला द्यायला हवा. आजचा भारत हा १९६२ चा भारत नसून २०२३ चा भारत आहे हे भारताने चीनला ठणकावून सांगायला हवे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here