कुख्यात गुंडावर गोळीबार करून केला खून.

कुख्यात गुंडावर गोळीबार करून केला खून.

त्रिशा राऊत नागपुर क्राइम रिपोर्टर
मो 9096817953

नागपुर:- आठवडी बाजारात दुकान लावण्यावरून जुन्या वादातून चौघांनी कुख्यात गुंडावर गोळीबार करून खून केला. ही खळबळजनक घटना गुरुवारी (ता.३) रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणपतीनगरच्या आठवडी बाजाराजवळ राज टॉवर समोर घडली.या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत, चौघांना अटक केली. यातील दोन आरोपी कुख्यात गुंड असून त्यांच्यावर यापूर्वीही खुनाचे गुन्हे दाखल आहेत. सोहेल बबलू खान (वय २९, रा. नया बस्ती, भगवान किराणा स्टोअर्स मागे, मंगळवारी बाजार) असे मृतक गुंडाचे नाव असून भुषण ऊर्फ बाल्या जयकुमार बहाड (वय ३५, रा. भांडेप्लॉट), गजेन्द्र रामचंद्र मरकाम (वय ३४, रा. गोपाळ कृष्ण लॉन जवळ, वाठोडा), धीरज धर्मराज घोडमारे वय २९, रा. थोटे कॉलेजमागे, नरसाळा), चंद्रशेखर ऊर्फ चंदू शंकररावजी डोंगरे (वय ३६, रा. बापूनगर, नंदनवन), नंदू जैस्वाल अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेल याच्यावर मानकापूर उड्डाणपुलावर हवेत गोळीबार केल्याचा गुन्हा दाखल आहे. तो परिसरात दादागिरी करीत होता.

भूषण आणि नंदू जैस्वाल हे मंगळवारी परिसरात असलेल्या गुरुवारी आठवडी बाजारात दुकान लावायचे. मात्र, परिसरात सोहेलची चलती असल्याने त्यांना कुठेही जागा मिळू द्यायची नाही, असा चंग त्याने बांधला होता. त्यामुळे भूषण आणि नंदू यांचे त्याचेशी खटके उडाले होते. सोहेल गुंड प्रवृत्तीचा असल्याने त्याने भुषणला जिवानिशी ठार मारण्याची धमकीही दिली होती.

दरम्यान गुरुवारी परिसरात आठवडी बाजार होता. सोहेल त्याच्या दुकानात काम करणारा मोहम्मद सुलतान आणि त्याचे साथीदारही आठवडी बाजार परिसरात होते. भूषण आपल्या साथीदारांसह त्याला शोधत त्याच्या दुकानाजवळ आला. सोहेल काही बोलेल इतक्यात त्याने थेट माऊझर काढून त्यांच्यावर गोळी झाडली.

त्यामुळे सोहेल खाली पडला. दुसरी गोळी त्याच्या मित्र, मोहम्मद सुलतान याच्यावर झाडली. गोळी त्याच्या कानापासून निघाली. तो तेथून पसार झाला. याशिवाय त्याचे साथीदारही पळू लागले. हे बघताच, भूषणने हवेत दोन राऊंड फायर केले. दरम्यान भूषणचे साथीदार गजेंद्र, धीरज, चंद्रशेखर या तिघांनीही सोहेलच्या छातीवर, पोटावर चाकूने वार करीत संपविले. धीरजच्या पायालाही जखमा झाल्यात.

युनिट तीनकडून चंद्रशेखरला अटक

गोळीबार करून खून करणाऱ्या भूषणचा एक साथीदार घटनास्थळावरून फरार झाला होता. तो नंदनवन परिसरातील बापूनगरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी पथकासह त्याला अटक केली. त्याला मानकापूर पोलिसांच्या ताब्यात दिले.

गोळीबारातील दोघांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी

या गोळीबारात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींपैकी दोन आरोपींना मानकापूर पोलिसांनी शुक्रवारी प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर सादर केले. यामध्ये भूषण ऊर्फ बाल्या जयकुमार बहाड (वय ३५, रा. भांडेप्लॉट), गजेन्द्र रामचंद्र मरकाम (वय ३४, रा. गोपाळ कृष्ण लॉन जवळ, वाठोडा) याचा समावेश होता. त्यांची न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता.१०) पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. धीरज घोडमारे सध्या मेयोत दाखल आहे. याशिवाय इतर दोन आरोपींना पोलिस उद्या न्यायालयात सादर करणार आहेत. दरम्यान सोहेल खान याच्या खुनानंतर मेयोत झालेल्या गोंधळानंतर अंत्यसंस्कारादरम्यान परिसरात पोलिसांनी बंदोबस्त लावला होता.

खुनानंतर पाचही जण परिसरात फिरत होते

खुनानंतर पाचही जण परिसरात फिरत असल्याने आठवडी बाजारात आलेले नागरिक सैरावैरा पळू लागले. ही माहिती मानकापूर पोलिसांनी मिळताच पोलिस निरीक्षक येडगे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिघांनाही अटक केली. धीरजला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. दरम्यान सोहेलचा लहान भाऊ परवेज बबलू खान (वय २९ रा.नया बस्ती, भगवान किराणा स्टोअर्स मागे, मंगळवारी बाजार) याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत चौघांना अटक केली.