*मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीतर्फे कॉ. महेंद्र सिंह यांना अखेरचा भावपूर्ण लाल सलाम!*

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, पक्षाच्या केंद्रीय कमिटीचे व महाराष्ट्र राज्य सचिवमंडळाचे सदस्य, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू)च्या राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, कॉ. महेंद्र सिंह यांचे आज ४ जुलै रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षे वयाचे होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना कोव्हिड झाला होता, पण ते त्यातून पूर्णतः सावरले होते.
कॉ. महेंद्र सिंह यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४३ रोजी झाला. ते इंजिनिअर होते आणि काही काळ डोंबिवलीतील कारखान्यात त्यांनी नोकरी केली. पण स्वतःच्याच कारखान्यात त्यांनी कामगारांची युनियन स्थापन केल्यामुळे मालकांनी त्यांची कलकत्त्याला बदली केली. तेथे माकप बळकट असल्यामुळे ते जास्तच प्रभावित झाले आणि नोकरी सोडून मुंबईत येऊन १९७१ साली ते पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले. म्हणजे त्यांच्या पक्ष जीवनाला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली.
पक्षात आल्यानंतर त्यांनी आधी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ही युवा संघटना स्थापन करून तिच्या कामास सुरुवात केली. तसेच १९७० साली नुकत्याच स्थापन झालेल्या सीटूच्या झेंड्याखाली त्यांनी ट्रेड युनियनचे काम सुरू केले. कॉ. के. एल. बजाज, कॉ. अशोक बॅनर्जी, कॉ. राधाकृष्ण मेनन, कॉ. एम. व्ही. गोपालन, कॉ. नंदू घोष, कॉ. पी. एम. वर्तक व इतर कॉम्रेडस् सोबत अनेक कारखान्यांत त्यांनी सीटू संलग्न युनियन्स स्थापन करून अंधेरीचे सीटू केंद्र उभे झाले.
१९७०च्या दशकात शिवसेनेचे हल्ले व त्यानंतर काँग्रेसच्या केंद्र सरकारच्या आणीबाणीच्या हल्ल्याविरुद्ध पक्षाने लढा दिला, त्यात कॉ. महेंद्र सिंह यांचे महत्त्वाचे योगदान होते. दलित पँथरच्या चळवळीला पक्षाने तेव्हा पाठिंबा दिला होता.
कॉ. महेंद्र सिंह लढाऊ कामगार नेते होते. १९८५ साली अरिस्टोक्राट कंपनीच्या मालकांनी सुपारी दिलेल्या गुंडांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला, अनेक दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते, पण त्यातून ते बचावले.
कॉ. महेंद्र सिंह यांची १९८७ साली पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीवर, १९९१ साली नाशिकच्या संघटना प्लीनममध्ये पक्षाच्या राज्य सचिवमंडळावर, आणि २०१५ साली विशाखापट्टनमच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाच्या केंद्रीय कमिटीवर निवड झाली. कॉ. पी. बी. रांगणेकर यांच्यानंतर महाराष्ट्राच्या पक्षाचे कोषाध्यक्षपद त्यांनी गेली अनेक वर्षे अत्यंत जबाबदारीने सांभाळले.
कॉ. डॉ. ए. बी. सावंत अनेक वर्षे पक्षाच्या मुंबई जिल्हा कमिटीचे सेक्रेटरी होते. त्यांच्यानंतर १९९४ साली कॉ. महेंद्र सिंह यांची पक्षाचे मुंबई सेक्रेटरी म्हणून निवड झाली, आणि त्यांनी ती जबाबदारी २० वर्षांहून अधिक काळ २०१५ पर्यंत समर्थपणे सांभाळली. मुंबईत पक्ष व जनसंघटनांचा विकास करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
मुंबई-महाराष्ट्रातील डाव्या आणि प्रागतिक पक्षांच्या आणि संघटनांच्या नेत्यांशी कॉ. महेंद्र सिंह यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. अनेक संयुक्त आंदोलनांत त्यांचे नेतृत्व असायचे. अगदी कालपरवा २६ जूनच्या ‘शेती वाचवा, लोकशाही वाचवा’ दिनी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात झालेल्या संयुक्त निदर्शनात आणि राज्यपालांना भेटण्यास गेलेल्या प्रतिनिधीमंडळात त्यांचा सहभाग होता.
सीटूच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलवर ते अनेक दशके होते आणि गेली अनेक वर्षे ते सीटूचे राज्य उपाध्यक्ष होते. काही वर्षांपूर्वी सीटूच्या राष्ट्रीय कौन्सिलवर त्यांची निवड झाली. मुंबई व्यतिरिक्त ठाणे-पालघर जिल्ह्यातील सीटूलाही त्यांनी मोलाची मदत केली.
डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) चे १९८६ साली मुंबईत पहिले महाराष्ट्र राज्य अधिवेशन झाले. त्यात संघटनेचे संस्थापक राज्य अध्यक्ष म्हणून कॉ. डॉ. विठ्ठल मोरे आणि संस्थापक राज्य सरचिटणीस म्हणून कॉ. महेंद्र सिंह यांनी निवड झाली. १९८९ पर्यंत त्यांनी ती जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली. संघटनेची पाळेमुळे महाराष्ट्रात पोहोचविण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. पुढे सुद्धा महाराष्ट्रातील युवा विद्यार्थी चळवळीला त्यांनी खूप मदत केली.
धर्मांध शक्तींविरुद्ध आणि नवउदारवादी धोरणांविरुद्ध कॉ. महेंद्र सिंह यांच्या मनात तीव्र चीड असायची. आणि त्यांच्या भाषणांतून आणि कृतींतून ते ती नेहमीच व्यक्त करायचे.
कॉ. महेंद्र सिंह यांची वैशिष्ट्ये म्हणजे साधी राहणी, कडवी तत्त्वनिष्ठा, जबाबदारीची तीव्र जाणीव, कष्ट घेण्याची तयारी, अत्यंत प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा, शिस्तप्रियता, आणि वरून कडक दिसणारा पण आतून प्रेमळ असणारा स्वभाव. असा सच्चा कम्युनिस्ट नेता आज आम्ही गमावला आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची महाराष्ट्र राज्य कमिटी कॉ. महेंद्र सिंह यांच्या स्मृतीस आपला लाल झेंडा झुकवत आहे, त्यांना अखेरचा भावपूर्ण लाल सलाम करत आहे, त्यांचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्याचा निर्धार करत आहे, आणि त्यांच्या पत्नी सावित्रीताई व त्यांच्या अन्य कुटुंबियांचे मनःपूर्वक सांत्वन करत आहे.
*कॉ. नरसय्या आडम*
*राज्य सेक्रेटरी व माजी आमदार*