नागपूर दुर्घटना: अंघोळ करणे अंगाशी आले?
अंकुश शिंगाडे
मो: ९३७३३५९४५०
“बाळ, पावसाळ्याचे दिवस आहेत. नको जावू फिरायला. अन् तलावाकडे किंवा नदीकडे नकोसच जावू.” एका आईची आपल्या बाळाला कणव. आई बाळावर प्रेम करते. मग ते बाळ कसेही असेना. आई आपल्या अनुभवातून बोलते. तिनं बरेच उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात. म्हणून ती बोलत असते. परंतु मुलं ऐकतील तेव्हा ना. मुलं मात्र स्वतःला शेरशहाच समजत असतात व तसेच वागत असतात.
आईचं ते बोलणं. त्यावर तो मुलगा म्हणाला,
“अगं मला जावू दे ना. मी काय मरायला चाललो काय?”
ते बाळ बोलून गेलं. ते त्या बाळाचं शेवटचं बोलणं.
ती एक सहल होती. तरुण मुलांनी आयोजीत केलेली. अलीकडं फिरायला जायचं फॅडच निर्माण झालंय. पैसे वाचविण्याऐवजी प्रत्येक माणसांचा पैसे उधळण्यात जीव. त्यातच कोणी वाईन, मांस घेवूनही फिरायला जात असतात. याही ठिकाणी तेच झालं.
ही ह्रृदयद्रावक घटना घडली नागपूरात. तब्बल पाच जण एका तलावात बुडून मरण पावले. काय गेलं त्यांचं. काहीच नाही. परंतु त्यांच्या पश्चात राहणारा तो परीवार किती शोकांकूल झाला असेल याची कल्पना न केलेली बरी. पाच जणांची प्रेतं जेव्हा त्या तलावातून बाहेर काढली. तेव्हा मात्र प्रत्येकच व्यक्ती गहिवरुन गेला होता. यातील दोन मुलं अशी होती की एकाला मायबापच नव्हते. तो आपल्या आजीजवळ राहात होता. त्याच्या घरी भरपूर मालमत्ता होती तर दुसरा एक असा होता की त्याचेही वडील पाचसहा वर्षापुर्वी मरण पावले होते. गत दोन महिण्यापुर्वीच त्याच्या लहान बहिणीचा विवाह झाला होता आणि आता तो व त्याची आई दोघंच घरात राहात होते. वडीलांचा पाच सहा वर्षापुर्वी आधार गेला, त्यावेळेस हाच मुलगा दहावीत होता. अतिशय लहान वय. त्यातच कमवता जीव गेल्यानं फार मोठं पहाड कोसळलं होतं त्या परीवारावर. तसं पाहता दोघंही भाऊबहीण अतिशय हुशार होते. दुर्दैव असं की आता शिकता येत नव्हतं. कारण त्यांच्या वडीलांच्या जाण्यानं घरावर फार मोठं संकट कोसळलं होतं. परंतु त्याच्या आईनं हिंमत सोडली नाही. ती परिस्थितीशी लढत राहिली. ती एका खाजगी कंपनीत लागली. ज्या ठिकाणी तिला फक्त अडीच हजार वेतन मिळायचं. काय करावं सुचायचं नाही. परंतु तेवढं अल्प वेतन मिळत असूनही तिनं आपल्या मुलांची शिक्षणाची आस पुर्ण केली. तिनं ऐपत नसतांनाही त्यांना शिकवलं. त्याच शिक्षणाच्या भरवशावर आज तो मुलगा एका खाजगी कंपनीत नोकरीला लागला होता. वेतन ब-यापैकी होतं.
वडीलांच्या मृत्यूला पाच सहा वर्ष झाले होते. आता मुलाला एका खाजगी कंपनीत जॉब लागल्यानं त्या मुलाची आर्थिक परिस्थिती सुधारली होती. अशातच त्यानं ठरवलं. आपल्या लहान बहिणीचा विवाह करायचा. तिला सुखी करायचं. मग आपलं पाहू. त्यानंतर त्यानं आपल्या बहिणीचा विवाह जोडला. त्यासाठी त्यानं एक लाख रुपये आपल्या नोकरीच्या भरवशावर कर्ज काढलं. मुलगाही ब-यापैकीच सापडला व तद्वतच त्यानं आपल्या बहिणीचा विवाह केला. त्या गोष्टीला आज दोन महिने झाले असतील.
आयुष्य……..आयुष्याची काही निश्चीती नाही. ते काही शाश्वत नाही. कोणाला केव्हा मरण येईल ते काही सांगता येत नाही आणि कुठे येईल हेही सांगता येत नाही. म्हणतात की प्रत्येकाचा मृत्यू हा ठरलेलाच असतो. परंतु मृत्यू काही दोष आपल्यावर येवू देत नाही. म्हटलं आणि मानलं जातं की अमूक व्यक्ती ऐकला असता तर त्याला मरण आलं नसतं. परंतु तो मृत्यू ठरलेलाच असतो. कोणाला झोपेत येतो तर कोणाला बसता बसता. कोणी चालता चालता मरण पावतो तर कोणी कोणत्याही स्वरुपात. काही तर मृत्यू अनुभवतातही. ते स्वतः मृत्यूचं तांडव पाहतात. परंतु मरत नाहीत. अशीच एक दुधावरची मुलगी माळीणच्या भुस्खलनात मलब्यामधून तीन दिवसानंतर सापडली होती. तशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री त्सुनामीच्या तडाख्यातून वाचली होती. तशीच ही घटना.
घटनेच्या दिवशी पाच जण फिरायला नागपूरात एका प्रसिद्ध तलावाच्या ठिकाणी गेले. पिकनीक मनवली. तशी सायंकाळ झाली व त्यांनी बेत आखला. आपण पार्टी मनवायची. ती पार्टी याच तलावाजवळ मनवायची. त्यातच त्यांनी नागपूरातीलच एका डॉक्टरला फोन केला व पार्टीचा उद्देशही सांगीतला व त्यालाही बोलावून घेतलं. तसा तो तिथं पोहोचताच थोडा अंधार पडायला लागला होता.
त्यांचा तो पार्टी करण्याचा बेत. कोणी म्हणतात की त्या पार्टीत काही जणांनी दारु प्राशन केली. त्यातच त्यातील एकजण म्हणाला,
“आपण अंघोळ करुया.” परंतु त्या अंघोळीच्या उपद्वव्यापावर बाकीच्यांनी नकार दिला. तोच तो मुलगा इतरांचे न ऐकता त्या तलावात अंघोळीसाठी गेला. तो अंघोळ करु लागला. त्यानंतर त्याची अंघोळ करणं बाकीचे पाहात होते. त्यांना तो मोह आवरला नाही. तसे बाकीचे उरलेले चारजण तिथं अंघोळीसाठी उतरले. कारण त्यांचा काळ हा आलाच होता. मात्र त्यातील एकजणाचं मरण आलं नव्हतं. तो अंघोळीसाठी गेलाच नाही.
ते पाचही जण. त्यांना पुरेसं पोहणं येत नव्हतं. तरीही ते अंघोळीसाठी पाण्यात उतरलेले. अशातच एकजण खोल पाण्यात गेला आणि आश्चर्याची गोष्ट ही की तो बुडायला लागला होता. म्हणतात की तो मुलगा बुडायला लागला होता. ते पाहून बाकीच्या चारमधून एकजण त्याला वाचवायला गेला. तशी दारु पोटात होतीच. त्यातच जो वाचवायला गेला, तोही बुडायला लागला. ते तिस-यांनं पाहिलं. त्यानंही तेच कृत्य केलं. अशाप्रकारचं कृत्य बाकीच्यांनीही केलं व तब्बल पाचही जण त्या तलावात बुडून मरण पावले.
ते सर्व मित्रच होते. जीवासाठी जीव देणारे जीवलग मित्र. त्यांनी आपल्या मित्रांना वाचविण्याच्या चक्करमध्ये मरण पत्करलं होतं. अशातच ते पाचही जण बुडत आहेत ही घटना गाडीजवळ उभा असलेला एक मित्र पाहात होता. त्यानं त्यावेळेस त्यानंतर आरडाओरड केली व त्याच्या आरडाओरडीनंतर घटनास्थळी गावकरी व पोलिसताफा दाखल झाला. त्यानंतर शोधकार्य सुरु झालं व एकामागून एक अशी पाच प्रेते बाहेर काढली गेली. त्यात सर्व तरुण मुलं होती. कोणाचेच विवाह झालेले नव्हते.
आम्ही जन्म घेतो. आईवडील आम्हाला जन्म देतात. लहानाचे मोठे करतात. उन्हातून सावलीत नेतात. शिक्षण शिकवतात. लहान असतांना आम्ही आमच्या आईवडिलांच्या आज्ञेत वागतो. त्यांचं ऐकतो नव्हे तर ऐकावंच लागतं. कारण त्यांचा धाक असतो त्यावेळेस आमच्यावर. कधीकधी त्यांचा रागही येतो आम्हास. वाटतं की हे मायबाप उगाचंच आम्हाला काहीबाही बोलतात. परंतु त्यांचं बरोबर असतं. ते जे सांगतात, ते अनुभवातून बोलत असतात. परंतु आम्ही ऐकू तेव्हा ना. आम्ही आमच्या आईवडीलांचं ऐकत नाही. मोठे झालो की आम्ही स्वतःला फार हुशार झालो तेच समजतो. त्यातूनच अशाप्रकारच्या घटना घडतात.
या पाचपैकी त्या दोन मुलांची कहाणी. अगदी चित्रपटाला शोभेल अशी कहाणी आहे. अगदी त्या मुलाचा उमेदीचा काळ. संकटांचे दिवस निघून गेले होते आणि आता सुखमय जीवन येणार होते. अशातच ही दुर्घटना घडली. काय म्हणावं या घटनेला. नावच देता येत नाही. अगदी सुन्न करणारी घटना.
महत्वाचं सांगायचं म्हणजे बाळांनो, तुम्ही आपल्या आईवडीलांचे काळजीचे तुकडे आहात. जरा जपून पावलं टाका. काळ तुमचीच वाट पाहात आहे. ज्यांना आईवडील आहेत, त्यांचं ठीकच आहे. जर ते आपल्या आईवडिलांचं ऐकतील तर. तुम्ही आपल्या आईवडीलांचं ऐकाल तर तराल. नाहीतर समदा जन्म बेकार आहे.
ती घटना. त्या घटनेत अंघोळ करणे अंगाशी आले. जर आईचं त्या बाळानं कदाचीत ऐकलं असतं तर कदाचीत ही त्या मुलाच्या बाबतीत तरी अशी घटना घडली नसती. तसंच त्या मुलानं नकार देताच बाकीच्याही मुलांनी आपला बेत बदलविला असता. परंतु नाही. कोण ऐकणार आपल्या आईचं. आपणही आता मोठे झालो ना. आपण लहान थोडे ना राहिलो. आपल्याला सारं कळतं. अशाच आविर्भावात आपण वागत असतो. परंतु आपण जरी मोठे झालो असलो तरी आपल्या आईवडीलांपेक्षा मोठे नसतो. त्यांचा एकेक शब्द हा मोलाचा असतो. जो ऐकतो तोच तरतो. यात तसूभरही असत्यता नाही. परंतु कोण ऐकणार. कोणीच ऐकत नाही आजच्या काळात आपल्या आईवडिलांचं. उलट आपणच आपल्या आईवडीलांना उलट उत्तरे देवून मोकळे होतो.
विशेष सांगायचं म्हणजे आपली आई आपले वडील जे काही सांगतात. ते खरं असो की खोटं. त्यात फाटे फोडू नयेत. ते ऐकायलाच हवं. कारण त्या बोलण्यात काहीतरी अर्थ नक्कीच असतो हे निर्विवाद सत्य आहे.