१५ ऑगष्ट पासून प्रवाशांना एसटीचे लोकेशन देखील मोबाईलवर मिळणार

158

एसटीच्या १४ हजार ५०० बसमध्ये जीपीएस लोकेशन यंत्र बसवण्यात येणार आहे

प्रतिनिधी : संजय पंडित

दि. २, मुंबई : आपली एसटी कुठपर्यंत पोहोचली हे प्रवाशांना आता अॅपच्या माध्यमातून समजणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) एक अॅप तयार करण्यात आलं असून लालपरीचे लोकेशन समजू शकणार आहे. एसटी तिकीटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टॅन्डवर येण्याची अचूक वेळ समजणार आहे. १५ ऑगस्टला हे अॅप प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. सध्या एसटीच्या १४ हजार ५०० बसमध्ये जीपीएस लोकेशन यंत्र बसवण्यात येणार आहे.

राज्यभरात सध्या ५० हजार मार्गावर एसटीच्या सुमारे सव्वालाख फेऱ्या होतात. लाखो प्रवासी एसटीतून प्रवास करतात. गावखेड्यात एसटी जिवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. ज्या भागांमध्ये रेल्वे पोहोचत नाही तिथे एसटी पोहोचते. अनेकजण लांब पल्ल्यांचा प्रवास असेल एसटीचे आगाऊ आरक्षण करुन तिकीट बुक करतात. पण अनेकदा ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्यामुळं एसटीला उशिरा आली तर प्रवाशांना ताटकळत उभं राहावं लागतं. पण आता प्रवाशांची ही समस्या कायमची मिटणार आहे. 

मधल्या थांब्यावर एसटी नेमकी कधी येणार याची माहिती मिळत नसल्याने तासनतास ताटकळत राहावे लागते. यासाठी महामंडळाने तयार केलेल्या अॅपच्या मदतीने बसचे थांबे आणि त्यांच्या निवडलेल्या स्थानकामध्ये ती येण्याचा अपेक्षित वेळ समजणार आहे. यासाठी बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. सध्या १२००० बसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित सर्व बसमध्ये जीपीएस बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.