“मिनी पाकिस्तान?” वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा – वकील सुमित साबळे यांची मागणी
संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३
नेरळ भागात “मिनी पाकिस्तान?” होत आहे असा गंभीर आरोप एका व्हिडिओद्वारे व काही प्रसार माध्यमातून करण्यात आला असून, यामुळे स्थानिक पातळीवर सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रकारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी वकील सुमित साबळे, आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष, यांनी केली आहे.
एका व्हिडिओमध्ये नेरळ व कर्जत परिसरात विशेष धार्मिक समुदायासाठी ‘हलाल लाईफस्टाईल’वर आधारित सोसायट्यांची निर्मिती होत असल्याचा दावा करत हा भाग “मिनी पाकिस्तान” होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे. हे वक्तव्य अत्यंत भडकाऊ असून, त्यातून समाजात द्वेष आणि फुटीरता पसरवण्याचा उद्देश असल्याचा आरोप केला जात आहे.
या प्रकरणी प्रतिक्रिया देताना सुमित साबळे म्हणाले, “हे वक्तव्य केवळ चुकीचेच नाही, तर समाजात भेदभाव आणि अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली पाहिजे. यामध्ये जे कोणी व्यक्ती/माध्यम सहभागी आहेत, त्यांच्यावर त्वरित भादंवि कलम १५३(अ), ५०५ अंतर्गत गुन्हा दाखल करावा. कायदा व सुव्यवस्था टिकवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.”
सामाजिक सलोखा आणि शांतता कायम राहावी यासाठी प्रशासनाने या प्रकरणाचा सखोल तपास करावा, आणि जर कोणताही समुदाय हेतुपुरस्सर चुकीच्या पद्धतीने टार्गेट केला जात असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
🔴 पार्श्वभूमी:
नेरळजवळ एका नव्या प्रकल्पाच्या जाहिरातीत “हळाल लाईफस्टाईल अपार्टमेंट – केवळ मुस्लिमांसाठी” अशी अट असल्याचा आरोप व्हिडिओद्वारे करण्यात आला होता. यावरून विविध प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी याला धर्माधारित भेदभाव म्हटले आहे, तर काहींनी याला केवळ विपणन धोरण मानले आहे.
⛔ कायद्यानुसार:
सामाजिक सलोखा भंग करणारे, धार्मिक भावना भडकवणारे किंवा विभाजनवादी वक्तव्ये केल्यास भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.