धान्य न घेतल्याने रायगड मधील १३हजार रेशनकार्ड वरील धान्य बंद

37

धान्य न घेतल्याने रायगड मधील १३हजार रेशनकार्ड वरील धान्य बंद

३५हजार नागरिकांना फटका:सलग सहा महिने धान्याची उचल न केल्याने कारवाई

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- सलग सात महिने रेशन वरील धान्याची उचल न केलेल्या १२ हजार ९४५ कार्ड वरील ३४ हजार ७१४ व्यक्तींचे धान्य बंद करण्यात आले आहे. जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य योजनेतील मिळून ४ लाख ४८ हजार ८६९ एवढी रेशन कार्ड आहेत. डिसेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत धान्य ना उचलल्याने सद्यस्थिती धान्य पुरवठा बंद केला आहे. अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
रेशनकार्ड धारकांना मोफत दिल्या जाणाऱ्या धान्याचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. लाभार्थी असूनही धान्य उचलत नसल्याने अशा ग्राहकांचे धान्य बंद करून इतर लाभार्थीना मिळावे असे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने माहितीच्या आधारे सलग सात महिने धान्याची उचल न केलेल्या १२ हजार ९४५ कार्ड वरील ३४ हजार ७१४ व्यक्तींचे धान्य बंद केले आहे.
केंद्र सरकारकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत संर्व अंत्योदय आणि प्राधान्य योजनेअंतर्गत मोफत धान्य दिले जाते. यामध्ये अंत्योदय कार्ड धारकांना प्रति कार्ड ३५ किलो तर प्राधान्य योजनेतील प्रतिसदस्य ५ किलो मोफत धान्य मिळते. असे असूनही लाभार्थी धान्य उचलत नसल्याचे तपासणी अंती लक्षात आल्यावर गेल्या सात महिन्यापासूनच धान्य बंद केले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हि धान्य दिले नसल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील ४ लाख ४८ हजार ८६९ रेशन कार्ड धारकांपैकी ७५ टक्के कार्डधारकांना आपली ई-केवायसी पूर्ण केलेली आहे.
केंद्र सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली सुधारणा आदीच्या अंतर्गत ज्यांनी सहा महिन्यापासून रेशन घेतलेला नाही. त्यांचे कार्ड सक्रिय राहणार नाहीत. त्यानंतर तीन महिन्यात घरोघरी पडताळणी आणि इ- केवायसी द्वारे पुन्हा पात्रता निश्चित केली जाईल. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशन न घेणारे देखील या कक्षेत येतील. देशात 23 कोटी सक्रिय रेशन कार्ड आहेत या प्रक्रियेतील कार्ड रद्द केली जातील. हे चौकशीनंतर स्पष्ट होईल.

गेले सहा महिने ज्यांनी धान्याची उचल केली नसेल त्याचा धान्य पुरवठा सरकारच्या आदेशाने बंद केला आहे. मात्र त्यांना पुढील धान्य घेण्यासाठी पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने कार्यवाही करावी लागेल. मग धान्य मिळू शकेल.
सर्जेराव सोनावणे जिल्हा पुरवठा अधिकारी रायगड.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील धान्य बंद केल्याची माहिती
तालुका कार्ड संख्या अंत्योदय प्राधान्य योजना
कार्ड संख्या माणसे कार्ड संख्या माणसे
अलिबाग २६५ ४० ६७ २२५ ६०४
कर्जत ५१६ ९२ १४८ ४२४ १२८३
खालापूर ७३१ १५७ ३२७ ५७४ १७९४
महाड १४९३ १६७ ३८७ १३२६ ३४२१
माणगाव ४१८ ७७ १६६ ३४१ ८७६
म्हसळा २३९ १४ २१ २२५ ५९५
मुरुड ९५ ११ २१ ८४ १८५
पनवेल ६४४४ २०६ ४८३ ६२३८ १७३४५
पेण ८९५ १६१ ३३७ ७३४ १९९०
पोलादपूर ५२१ १०८ २१६ ४१३ ९४९
रोहा ४९९ १६२ ३७३ ३३७ ९७२
श्रीवर्धन १४४ १५ ३० १२९ ३४३
सुधागड ३५५ २०७ ५४७ १४८ ४५३
तळा २०२ ४१ ७७ १६१ ४४७
उरण १२८ ५ ६ १२३ २५१
———————————————————————
एकूण १२९४५ १४६३ ३२०६ ११४८२ ३१५०८