अपघातांवर सुवर्ण नियमांचा उतारा
रायगड जिल्हा वाहतूक शाखेचा नाविन्य उपक्रम
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड वाहतूक शाखेने दहा सुवर्ण नियम सुरू केले आहेत. बेशिस्त चालकांना शिस्त लावण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे. या नियमांतून अपघात टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे नियम वाहनचालकांना वरदान ठरणार आहेत.
रायगड औद्योगिक जिल्हा म्हणून नावारूपाला येऊ लागला आहे. जिल्ह्यात पर्यटनही दिवसेंदिवस वाढत आहेत. अवजड वाहनांसह दुचाकी व अन्य वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे. वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हाती घ्यावे लागतात. काहीं विरोधात दंडात्मक कारवाई तर काहींना प्रबोधनात्मक संदेश देऊन वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे.
वाहतूक शाखेने बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी एक नाविन्य उपक्रम हाती घेतला आहे. दहा सुवर्ण नियम वाहन चालकांसाठी जनजागृती म्हणून लागू केले आहे. महामार्गासह रस्त्यावर ठिकठिकाणी हे दहा नियम फलकांद्वारे लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न जिल्हा वाहतूक शाखेने केला आहे. फलकाद्वारे दहा नियमांची माहिती दिली जात आहे. त्यामध्ये दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करावा.चारचाकी वाहन चालविताना सिट बेल्टचा वापर करावा. वेग मर्यादेपेक्षा अतिवेगात वाहन चालवू नये.मद्य प्राशन करून वाहन चालवू नये.वाहन चालविताना लेन कटींग करू नये.पादचाऱ्यांनी नेहमी फुटपाथचा वापर करावा. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये. रस्त्यावर धोकादायकरित्या वाहन चालवू नये. पादचाऱ्यांनी झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी रस्ता ओलांडावा. वाहन चालविताना पादचाऱ्यांना प्राधान्य द्यावा या दहा नियमांचा समावेश आहे.