माझी लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसी अडचणी लवकर दूर होणार : मंत्री आदिती तटकरे यांचे आश्वासन

36

माझी लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसी अडचणी लवकर दूर होणार : मंत्री आदिती तटकरे यांचे आश्वासन

माझी लाडकी बहीण’ योजनेतील ई-केवायसी अडचणी लवकर दूर होणार : मंत्री आदिती तटकरे यांचे आश्वासन

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान भेडसावणाऱ्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर करण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. “लवकरच ओटीपीसंबंधी समस्या संपुष्टात येईल आणि ई-केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व वेगवान बनेल. सर्व लाडक्या बहिणींना मी आश्वस्त करते,” असे तटकरे यांनी सांगितले.

राज्य सरकारने या योजनेत सर्व महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. मात्र, ओटीपी न मिळणे किंवा तांत्रिक त्रुटींमुळे अनेक महिलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर उपाययोजना सुरू असून तांत्रिक तज्ज्ञांकडून आवश्यक बदल केले जात आहेत, असेही मंत्री तटकरे यांनी नमूद केले.

या योजनेत लाभार्थी महिलेचीच नव्हे, तर तिच्या पती किंवा वडिलांची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. यामागचा उद्देश म्हणजे वार्षिक उत्पन्न पडताळणी करणे हा आहे. लग्न झालेल्या महिलांसाठी पतीचे उत्पन्न आणि अविवाहितांसाठी वडिलांचे उत्पन्न विचारात घेतले जाईल. अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त एकत्रित वार्षिक उत्पन्न असल्यास महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे.

याशिवाय, पती किंवा वडिलांच्या नावे चारचाकी वाहन असल्यास, तसेच एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केल्यास केवळ एका महिलेलाच लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांनाच पात्रता आहे. सरकारच्या मते, या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना मदतीचा हात देणे हा असून, ई-केवायसी प्रक्रियेत अडथळे निर्माण करणाऱ्या अडचणी लवकर दूर होतील, असा विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला.