शाळेच्या मुख्याध्यापका सोबत वाद, महिला शिक्षिकेनं शाळेतच प्राशन केल विष.

52

शाळेच्या मुख्याध्यापका सोबत वाद, महिला शिक्षिकेनं शाळेतच प्राशन केल विष.

बीड जिल्हा प्रतिनिधी✒
बीड,5 डिसेंबर:- बीड जिल्ह्यातील माजलगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. माजलगाव येथील एका महिला शिक्षिकेनं शाळेच्या आवारातचं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकासोबत वाद झाल्यानंतर, संबंधित शिक्षिकेनं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्यानंतर, शाळेत एकच खळबळ उडाली आहे. संबंधित शिक्षिकेवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. संगीता राठोड असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षिकेचं नाव आहे. त्या माजलगावजवळील राजेवाडी येथील एका शाळेत शिक्षिका आहेत.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून त्यांचा शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड यांच्यासोबत संगीता राठोड या महिला शिक्षकेच्या वाद सुरू आहे. यापूर्वी देखील त्यांच्यात अनेकदा वाद झाला आहे. गावकऱ्यांनी मध्यस्थी करत त्यांच्यातला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांच्यातील हा वाद सुरूच होता.

दरम्यान, 26 नोव्हेंबर रोजी दोघांमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचं भांडण झालं. शाळेचा मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या वादाला वैतागलेल्या गावकऱ्यांनी शाळेच्या मुख्य गेटलाच कुलूप लावलं. तसेच दोघांपैकी एकाची बदली झाल्या शिवाय शाळेचं कुलूप उघडलं जाणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोघांना चौकशीसाठी सोमवारी पाचारण केलं होतं. तत्पूर्वी शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास शिक्षिकेनं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

संबंधित शिक्षिका आणि त्यांच्या नातेवाईकांकडून गोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड यांनी केला आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यासोबत देखील चर्चा झाल्याचं जिंकलवाड यांनी सांगितलं आहे. संबंधित विष प्राशन केलेल्या शिक्षिकेची प्रकृती सुधारत असून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.