महाराष्ट्र राज्यातील 105 नगरपरिषदेच्या निवडणुका जाहिर, 21 डिसेंबरला मतदान.

✒️मुंबई महानगर प्रतिनिधी✒️
मुंबई:- महाराष्ट्र राज्यातील 105 नगरपरिषदेच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजले आहे. 21 डिसेंबरला नगरपरिषदेचं मतदान होत आहे. आता नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकिय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यात कोन बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे.
सन 2015 मध्ये अनेक ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर करण्यात आले होते. त्या नगर परिषदेचा प्रथम पाच वर्षांचा कार्यकाळ गतवर्षी नोव्हेंबरमध्ये संपुष्टात आला होता. पण कोरोना वायरसच्या महामारीमुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे वर्षभरापासून ही निवडणूक लांबणीवर गेली होती. दरम्यानच्या काळात प्रांताधिकारी यांच्या माध्यमातून नगरपरिषदेवर प्रशासक नमून कामकाज केले जात होते. सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी केली जात होती, मात्र निवडणुकीचा निश्चित कार्यक्रम जाहीर होत नसल्याने ही पूर्वतयारी आणि त्यासाठीचा खर्च किती दिवस करावा हा इच्छुक उमेदवारांसह राजकीय पदाधिकाऱ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला होता .
काल महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 105 नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार 21 डिसेंबरला मतदान आणि दुसऱ्याच दिवशी 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. कागदपत्रांची जुळवा जुळव करण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. निवडणुकीत अर्ज दाखल करण्यास 1 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
नगरपंचायतीसाठी प्रभागनिहाय आरक्षण असेल. एक सर्वसाधारण प्रभाग, दोन सर्वसाधारण स्त्री प्रभाग ,तीन अनुसूचित जमाती स्त्री , प्रभाग चार अनुसूचित जमाती , प्रभाग पाच सर्वसाधारण स्त्री , प्रभाग सहा ना.मा.प्र. स्त्री प्रभाग, सात सर्वसाधारण स्त्री, प्रभाग आठ अनुसूचित जमाती स्त्री, प्रभाग नऊ सर्वसाधारण, प्रभाग दहा सर्वसाधारण, प्रभाग अकरा सर्वसाधारण स्त्री, प्रभाग बारा ना.मा.प्र, प्रभाग तेरा सर्वसाधारण, प्रभाग चौदा ना.मा.प्र.स्त्री, प्रभाग पंधरा अनुसूचित जाती , प्रभाग सोळा सर्वसाधारण स्त्री, प्रभाग सतरा ना.मा.प्र अशी प्रभागरचना करण्यात आली आहे.