जामिनावर सुटलेल्या बलात्काराच्या आरोपीने बाहेर येताच पुन्हा केला बलात्कार.
मध्य प्रदेश:- मधील रायसेन येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेला आरोपी जामिनावर बाहेर आला आणि बाहेर येताच त्याने पुन्हा एकदा बलात्कार केला. पीडित महिलेने केलेल्या तक्रारीनंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे.
हे प्रकरण सलामतपूर पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या अंबाडी गावचे आहे. येथे जामिनावर सुटलेल्या हरिकिशन नावाच्या आरोपीने रात्रीच्या सुमारास विधवा महिलेला एकटे गाठून तिच्यावर अत्याचार केला. बलात्कारानंतर आरोपीने पीडितेला जिवे मारण्याची धमकी दिली आणि फरार झाला. यानंतर पीडित महिलेने पोलीस स्थानक गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता विधवा असून एकटी राहते. रविवारी रात्री साडे अकरा वाजता घरात झोपलेली असताना अचानक आरोपी तिच्या घरात घुसला आणि एकटी असल्याचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात कलम 376 (2 एन), 450, 323, 506 अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी पथक बनवले आणि खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला त्याच गावातून अटक केली. अटक केलेला आरोपी एक महिन्यापूर्वी जामिनावर बाहेर आला होता, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक संगिता काजले यांनी दिली आहे.