pm-modi-security-issues-in-punjab

pm-modi-security-issues-in-punjab

सिद्धांत
६ जानेवारी २०२१: बुधवारी सकाळी हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शाहिद स्मारकाला भेट देण्यासाठी पंतप्रधान मोदी भटिंडा विमानतळावर उतरले. खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरने पुढचा प्रवास न करता पंतप्रधानांचा ताफा तिथून जवळपास १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या हुसैनीवालाकडे हायवेच्या मार्गाने निघाला. परंतु स्मारकापासून ३० किलोमीटर अंतरावरील एका फ्लायओव्हरवर पंतप्रधानाच्या ताफ्याला मध्येच थांबावं लागलं. कारण फ्लायओव्हरच्या दुसऱ्या बाजूला जमलेल्या भारतीय किसान युनियनच्या शेतकऱ्यांनी रास्ता अडवून धरला होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवरच रस्ता मोकळा होण्याची वाट पाहत थांबावे लागले. अखेर शेवटी आंदोलक मागे न हटल्याने पंतप्रधानांना आपला पुढील  कार्यक्रम रद्द करून मागे फिरावे लागले.

अतीउच्च सुरक्षा व्यवस्थेमध्ये राहणाऱ्या देशाच्या पंतप्रधानांच्या वाटेमध्ये असा अडथळा येणे म्हणजे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या योजनेमध्ये झालेली फार मोठी चूक मानली जात आहे. ह्या चुकीमध्ये खरा दोषी कोण याबाबत आता देशभरात वाद-विवाद चालू आहेत. केंद्र सरकार आणि पंजाब राज्य सरकारमध्ये घडलेल्या घटनेबाबत चौकशांच्या फेऱ्या सुरु आहेत. गृह मंत्रालयाने “पंतप्रधानाच्या सुरक्षा व्यव्यस्था करण्यात झालेल्या गंभीर चुकीबद्दल” स्पष्टीकरण देण्याचा आदेश पंजाब राज्य सरकारला दिला आहे.

कशी असते पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था?

पंतप्रधानाची सुरक्षा करण्याची जबाबदारी हि मुख्यतः स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप ह्या सुरक्षा यंत्रणेची असते. १९८८ साली स्थापन झालेल्या या यंत्रणेवर भारत देशाच्या पंतप्रधानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देशात आणि परदेशात सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी असते. देशातल्या विविध सुरक्षा दलातल्या उल्लेखनीय आणि विशेष प्राविण्य मिळवलेल्या जवानांची निवड स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये केली जाते. राजकीय दौरे, सभा, उदघाटन समारंभ अश्या ठिकाणी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे जवान सतत पंतप्रधानाच्या अवतीभोवती असतात. दिल्लीमध्ये मुख्यालय असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये आजच्या घडीला जवळपास ३००० जवान असून त्यांचे एका वर्षाचे बजेट जवळपास ६०० कोटी इतके आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी सुरक्षा व्यवस्थेची आखणी कशी केली जाते?
स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप हि सुरक्षा यंत्रणा “ब्लू बुक” च्या ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी सुरक्षा व्यवस्थेची आखणी करते. यानुसार दौऱ्याच्या तीन दिवस अगोदर स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप तर्फे त्या दौरा असणाऱ्या राज्यातील गुप्तचर विभाग, राज्य पोलीस दल आणि स्थानिक पातळीवरील सुरक्षा अधिकाऱ्यांबरोबर एक मिटिंग घेतली जाते. ह्या सभेमध्ये पंतप्रधानांचा दौऱ्याची सुरुवात ते शेवट, या दरम्यानच्या प्रत्येक मिनिटाची आखणी केली जाते. ते कार्यक्रमाच्या ठिकाणी कसे पोहचणार आहेत? किती वेळ त्याठिकाणी थांबणार आहेत? त्या कार्यक्रम स्थळाचा आकार? त्याठिकाणची अग्निशामक यंत्रणा? त्यावेळच्या वातावरणाचा अंदाज? यासारख्या बाबींचा सूक्ष्म विचार केला जातो.
पंतप्रधानांचा ताफा हा रस्त्याच्या मार्गाने जाणारा असल्यास त्यालगतच्या परिसराची साफ सफाई केली जाते. अस्ताव्यस्त वाढलेली झाडंझुडपं कापली जातात. संवेदनशील भागात लगतच्या इमारतींवर स्नायपर जवान तैनात केले जातात.

सभा आणि राजकीय ठिकाणी लोकांच्या गर्दीमध्ये पंतप्रधानांचे संरक्षण करण्याचे काम स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपसाठी  मोठे जिकिरीचे बनते. अश्यावेळी कधीकधी वेषांतर करून, साध्या वेषातील जवान गर्दीमध्ये मिसळून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप केवळ पंतप्रधानांचेच रक्षण करतो. त्यामुळे रस्त्यातील चौकांवर पोलिसांच्या तुकड्या तैनात करणे, रस्त्यात येणारे ट्रॅफिक,नागरिकांचे आंदोलन यांसारखे अडथळे, कार्यक्रम स्थळावरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम राज्य पोलीस दलाचे असते.

पंतप्रधानाच्या दौऱ्यात ऐनवेळी बदल झाल्यास काय केले जाते?
दौऱ्याआधी पंतप्रधानांना कार्यक्रम स्थळी पोहचविण्यासाठी नेहमीच दोन मार्गांची व्यवस्था करून ठेवलेली असते, दोन्ही मार्गांवर तितक्याच कडक सुरक्षाव्यवस्थेचे नियमन केलेले असते. दौऱ्याच्यावेळी त्यावेळच्या वातावरणानुसार आणि यंत्रणांच्या सूचनेनुसार दोघांपैकी एका मार्गाची निवड केली जाते.

कसा असतो पंतप्रधानांचा ताफा.
पंतप्रधानांच्या ताफ्यामध्ये एका वेळी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे जवळपास शंभर जवान असतात. पंतप्रधान स्वतः मर्सिडीज मेबैक एस ६५० या गाडीतून प्रवास करतात. ताफ्यामध्ये अत्यावश्यक वेळी वापरण्यासाठी बुलेटप्रूफ यंत्रणेने सज्ज असलेल्या अश्या दोन गाड्या असतात. त्याचबरोबर चार बीएमडब्लू ७ सिरीज, चार रेंज रोव्हर्स, आठ ते १० टोयोटा फॉर्च्युनर, दोन मर्सिडीझ बेंझ रुग्णवाहिका त्याचबरोबर अनेक एस्कॉर्ट कार असतात. काळा कोट घातलेले आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असेलेले स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे जवान आजूबाजूच्या घडामोडीवर बारीक नजर ठेवून असतात. त्यांच्या परवानगीशिवाय कोणतीही गाडी किंवा व्यक्ती पंतप्रधानांच्या ताफ्याशेजारी येऊ शकत नाही. सीमारेषांजवळच्या भागातील पंतप्रधानांच्या दौऱ्यांच्या वेळी या सुरक्षेमध्ये अधिक वाढ केली जाते.

अशी प्रशस्त सुरक्षायंत्रणा असताना पंजाबमध्ये अशी चूक झाली कशी, याचा प्रश्न सगळयांना पडला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री यांनी या घटनेबाबत दिलेल्या प्रतिक्रियेनंतर चर्चेला राजकीय वळण लागत असल्याचे दिसून येत आहे. पंजाब मधील एका सभेमध्ये ते म्हणले कि, पंतप्रधान यांच्या होणाऱ्या सभेआधी पाच दिवस अगोदर आधीच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने कार्यक्रम स्थळांचा, वाहतूक मार्गावरील सुरक्षा व्यवस्थांचा आढावा घेतला होता. ऐनवेळी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपनेच परवानगी दिलेल्या दुसऱ्या मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करण्याचे ठरवले गेले आणि मग अर्ध्या रस्त्यातून पंतप्रधान परत माघारी फिरले.

पंतप्रधानांना दौऱ्यावेळी कोणताही धोका नव्हता. खरतर पंतप्रधान मोदींच्या राजकीय सभेला केवळ ७०० लोकच आल्याने ते दौरा अर्धवट सोडून गेले आणि आता चुकीचे खापर पंजाब राज्य सरकार आणि पोलिसांवर फोडत आहेत. त्यापेक्षा पंजाबमधील जनता विशेषतः शेतकरी त्यांना का विरोध करतात याचा त्यांनी विचार करावा, असे विधान पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी केले.

काही दिवसांपूर्वीच मेघालायचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मृत्युंविषयी पंतप्रधानांशी बोलताना ” शेतकरी काय माझ्यासाठी मेले का?” असा घमेंडी प्रतिप्रश्न मोदींनी त्यांना विचारल्याचे सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here