जमिनीच्या वादातून दोन गटांत झालेल्या मारामारीत वसईच्या पोमण गावातील माजी सरपंच बबन माळी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सोमवारी सकाळी वसई पूर्वेच्या शिलोत्तर गावात ही घटना घडली. या वेळी संतप्त जमावाने आरोपीच्या बंगल्याची नासधूस करून वाहने पेटवून दिली, तसेच टायर जाळून कामण-भिवंडी रस्ता रोखून धरला. यामुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी महेंद्रसिंग ठाकूर फरार झाला असून वालीव पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.
वसई पूर्वेच्या शिलोत्तर गावात राहणारे आणि पोमण गावचे माजी सरपंच बबन माळी (४२) आणि आरोपी महेंद्रसिंग ठाकूर(३८) हे दोन मित्र व्यावसायिक भागीदार होते. जमिनी खरेदी-विक्री करण्याचा, तसेच जमिनी घेऊन त्यावर औद्योगिक गाळे बांधण्याचा त्यांचा व्यवसाय होता. वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिलेल्या माहितीनुसार माळी आणि ठाकूर यांच्यात १५ एकर जमिनीवरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी सकाळी महेंद्रसिंग ठाकूर हे शिलोत्तर गावाजवळील शिवमंदिरात नेहमीप्रमाणे दर्शनासाठी जात होते. त्या वेळी माळी यांनी रस्त्यात अडवून त्यांना या व्यवहाराबाबत जाब विचारला. त्यात त्यांच्यात बाचाबाची झाली. त्या वेळी महेंद्रसिंग याने आपल्या रिव्हॉल्वरमधून माळी यांच्यावर एक गोळी झाडली. त्यात माळी यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर ठाकूर फरार झाला. या घटनेचे वृत्त समजताच संतप्त ग्रामस्थांनी आरोपी महेंद्रसिंग यांच्या घरावर हल्ला केला आणि वाहन जाळून टाकले. या वेळी दोन्ही गटांकडून दगडफे क करण्यात आली. त्यात माळी यांचे दोन भाऊ जगदीश आणि रवींद्र जखमी झाले. नागरिकांनी कामण-भिवंडी रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको केला. जमाव आणखी हिंसक होऊन कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी गावात राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपी) तुकडी तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण होते.