सलमाननं आज त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट केलंय जे तुफान व्हायरल झालंय. ‘मुझे लडकी मिल गयी’ अर्थात ‘मला मुलगी मिळाली आहे’ असं ट्विट खुद्द सलमान खाननं केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलंय. सलमान लग्न कधी करणार? हा त्याच्या चाहत्यांना पडलेला आजवरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळाल्याचे काही चाहते सांगतायेत… तर इतरांच्या म्हणण्यानुसार सलमानला त्याच्या नव्या चित्रपटासाठी हिरॉइन सापडली असण्याची शक्यता वर्तवली जातेय.
सोशल मीडियावर सलमानच्या या एका ट्विटनं चांगलाच धूमाकूळ घातलाय. सल्लूमियाँच्या आयुष्यातील ही ‘मिस्ट्री गर्ल’ नेमकी कोण आहे याविषयी चाहत्यांनी फार तर्क लावण्याच्या आतच त्यानं दुसरं ट्विट करत याचा खुलासा केलाय. सलमानला लग्नासाठी कोणी मुलगी मिळाली नसून, आगामी ‘लवरात्री’ या चित्रपटासाठी हिरॉइन सापडलीय. त्यामुळे सलमानच्या लग्नाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडलीय.