शिवसेना नगरसेवकाच्या पत्नीची तक्रार घेण्यास कळवा पोलिसांची टाळाटाळ
ठाणे महापालिका निवडणुकीच्या काळात विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्यामुळे चर्चेत असलेले कळव्यातील शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे हे पत्नी कॅरलिन यांना केलेल्या मारहाणीप्रकरणी पुन्हा वादात सापडले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून गणेश कांबळे हे आपल्याला सातत्याने मारहाण करीत असल्याचा आरोप त्यांच्या पत्नी कॅरलिन यांनी केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवडय़ात गणेश यांनी केलेल्या मारहाणीची तक्रार करण्यासाठी कळवा पोलीस ठाण्यात गेलेल्या कॅरलिन यांना पोलिसांनी लग्नाचा दाखला घेऊन येण्यास सांगत या प्रकरणी कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. कॅरलिन यांनी आता याबाबत पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे तक्रार केली आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत कळवा परिसरात शिवसेनेच्या तिकिटावर गणेश कांबळे हे निवडून आले. ते कळव्यातील महात्मा फुलेनगर परिसरात राहतात. पत्नी कॅरलिन आणि दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. गेल्या दोन वर्षांपासून गणेश कांबळे हे घरगुती कारणांवरून सातत्याने आपल्याला मारहाण करीत असल्याचे कॅरलिन यांचे म्हणणे आहे. २८ जानेवारीला सायंकाळी गणेश यांनी घरगुती कारणावरून हातांनी बेदम मारहाण करून भिंतीवर डोके आपटले, अशी तक्रार कॅरलिन यांनी केली आहे. या मारहाणीदरम्यान मदतीसाठी आलेल्या शेजाऱ्यांनाही त्यांनी मारहाण केली, असे त्यांनी सांगितले. या घटनेनंतर कॅरलिन यांच्या मुलाने पोलिसांना बोलावून घेतले. मात्र, पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. गणेश यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी कॅरलिन यांनी केली. मात्र, त्यासाठी त्यांना दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात येण्याची सूचना देण्यात आली. त्यानुसार दुसऱ्या दिवशी करॅलिन या पोलीस ठाण्यात गेल्या असता, पोलिसांनी त्यांच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि लग्नाचा दाखल्याची मागणी केली. कागदपत्रे आणल्यानंतरच तक्रार नोंदविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे कॅरलिन यांनी पोलीस आयुक्तांकडे पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
यापुर्वी एका गुन्ह्यात गणेश यांना पत्नी म्हणून आपण जामीन दिला होता. असे असताना पोलीस लग्नाचा दाखला मागत असल्याबद्दल कॅरलिन यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. गणेश यांची परिसरात दहशत असल्यामुळे त्याच्याविरोधात कुणीच बोलत नसून पोलीसही त्याच्यावर अटकेची कारवाई करीत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. या संदर्भात कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.आर. बागडे यांच्याशी संपर्क साधला असता, कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदविण्यासाठी पोलिसांनी आधारकार्ड, पॅनकार्ड आणि लग्नाचा दाखल्याची मागणी केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच कॅरलिन या स्वत: तक्रार नोंदवीत असताना पोलीस ठाण्यातून अचानक निघून गेल्या आणि त्यानंतर पुन्हा तक्रार नोंदविण्यासाठी आल्या नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
नगरसेवक तडीपार?
शिवसेना नगरसेवक गणेश कांबळे यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी लक्षात घेऊन त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यासंबंधीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे १५ दिवसांपूर्वी पाठविला असल्याचे कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस.आर. बागडे यांनी सांगितले. या प्रस्तावामुळे गणेश कांबळे हे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
मारहाणीची कबुली
यासंदर्भात गणेश कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कॅरलिन यांना मारहाण केल्याची कबुली दिली. हा प्रकार किरकोळ घरगुती वादातून घडला असून रागाच्या भरात आपल्याकडून हे कृत्य घडले, असे ते म्हणाले.
नियम काय?
पोलीस दलातील अधिकारी व कायदेतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये लग्नाचे प्रमाणपत्र पुरावा म्हणून जोडले जात असले तरी यासंबंधीची तक्रार नोंदविताना आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच लग्नाचे प्रमाणपत्र देण्यासंबंधी कायद्यात अशी तरतूद नाही.